– विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. विजय कोल्हे यांनी चारु वर्मा यांची सरकारी साक्षीदार म्हणून सरतपासणी घेतली.
– दहशतवादी रईस अहमदने विमानाचे तिकीट ‘यूएस डॉलर’मध्ये बुक केल्याची न्यायालयात साक्ष
नागपूर :- महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची तसेच रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी केल्याप्रकरणी अटकेत असलेला कथित दहशतवादी रईस अहमद शेख असदुल्ला शेख याच्याविरोधातील खटल्यात सोमवारी महत्त्वाची साक्ष नोंदविण्यात आली. इंडिगो एअरलाईन्सचे तत्कालीन विमानतळ व्यवस्थापक चारु वर्मा यांनी विशेष सत्र न्यायालयात साक्ष दिली.
वडिलांच्या कार्डचा वापर
विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. विजय कोल्हे यांनी चारु वर्मा यांची सरकारी साक्षीदार म्हणून सरतपासणी घेतली. त्यावेळी रईसने नागपूरला येण्यासाठी इंडिगोचे विमान तिकीट ‘यूएस डॉलर’मध्ये भरल्याची बाब समोर आली. तसेच या व्यवहारासाठी त्याने वडिलांच्या कार्डाचा वापर केल्याचेही साक्षीत नमूद करण्यात आले.
श्रीनगरहून मुंबईमार्गे नागपुरात
सरकारच्या दाव्यानुसार, रईस हा ‘जैश-ए-मोहम्मद’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य असून संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिराची रेकी करण्याच्या उद्देशाने तो नागपुरात आला होता. तपासानुसार, त्याने इंडिगोच्या संकेतस्थळावरून विमान तिकीट बुक केले होते. त्यानंतर १३ जुलै २०२१ रोजी श्रीनगरहून मुंबईमार्गे नागपुरात आगमन केले आणि १५ जुलै २०२१ रोजी दिल्लीमार्गे श्रीनगरला परतला होता.
२०२१ मध्ये अटक
दरम्यान, सप्टेंबर २०२१ मध्ये काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी रईसला ताब्यात घेतल्यानंतर संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर रेकीचा कथित कट उघडकीस आला. दहशतवादविरोधी पथकाने त्याला काश्मीरमध्ये अटक करून नागपुरात आणले होते. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून सुनावणीदरम्यान त्याची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती नोंदविण्यात आली.
जामीनासाठी अयशस्वी प्रयत्न
रईसने यापूर्वी जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता कोणत्याही न्यायालयाने त्याला दिलासा दिलेला नाही. उच्च न्यायालयातही सरकारने त्याच्याविरोधात दहशतवादी कारवायांशी संबंधित ठोस पुरावे असल्याचा दावा केला होता.
– फाईल फोटो