नागपूरमध्ये ‘कोण बनेल शेफ नं. 1’ पाककला स्पर्धेचे तिसरे पर्व – विश्वविक्रमाचा रंगणार नवा सोहळा!

0
55
 
नागपूर ३० – महाराष्ट्र टेलीकम्युनिकेशन्स नागपूरच्या शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित होत असलेली, ‘कोण बनेल शेफ नं. 1’ पाककला स्पर्धा यंदा तिसऱ्या पर्वात दाखल होत आहे. वाघमारे मसाले व २४ कॅरेट ऑईलद्वारा प्रायोजित व काॅन्फिडन्स गृप व रचना कन्स्ट्रक्शनद्वारा सहप्रायोजीत या स्पर्धेने मागील तीन वर्षांत हजारो पाककला प्रेमींसाठी एक व्यासपीठ निर्माण केले असून, यंदा या सोहळ्याला भव्यतेचा आणखी एक पैलू लाभणार आहे. दिनांक 13 व 14 सप्टेंबर रोजी संचेती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे ही स्पर्धा संपन्न होईल.
 
विशेष म्हणजे, कॅन्सरवर मात करत पाककलेत नवनवे आयाम निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यंदाही या उपक्रमात सहभागी होत असून, आणखी एक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. मागील वर्षी त्यांनी तब्बल 1000 किलो आंबील तयार करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले होते. यंदाही शेफ नीता अंजनकर एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहेत.
 
या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी, 13 सप्टेंबर रोजी, स्पर्धक आपापल्या घरी तयार केलेली आवडीची पाककृती स्पर्धेत सादर करतील. उत्कृष्ट ठरणाऱ्या पाककृतींना आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू देण्यात येतील.
 
दुसऱ्या दिवशी, 14 सप्टेंबर रोजी सकाळी, नीता अंजनकर यांचा नवा विक्रम साकारल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. पाककला प्रेमींसाठी ही एक अनोखी संधी आहे. नागपूरकरांना या अद्वितीय सोहळ्यात सहभागी होऊन पाककलेचा आस्वाद घेण्याचे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.