– दारूच्या नशेत वादातून हत्या
सांगवी :- पिंपळे गुरव येथील श्रीनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये कचऱ्यात पुरुषाचे दोन पाय आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी प्राथमिक तपासात उलगडा केला आहे. अनिल खाडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, विष्णू कुंभार याने दारूच्या नशेत झालेल्या वादातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहाचे धड नवी सांगवीतील विनायकनगर गल्ली क्रमांक एक येथे टाकण्यात आले, तर दोन पाय श्रीनगर गल्ली क्रमांक तीनसमोर टाकल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास काटेपुरम चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय रोडवरील श्रीनगर गल्ली क्रमांक तीन येथे रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुरुषाचे दोन पाय आढळले. कचरा उचलत असताना हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिल खाडे आणि विष्णू कुंभार यांच्यात दारूच्या नशेत बाचाबाची झाली. या वादातून कुंभार याने खाडे यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून धड आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, संशयित कुंभार हा मानसिक रुग्ण असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी वाहन चोरीचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समजते. उपायुक्त संदीप आटोळे, साहाय्यक आयुक्त मनीषा कदम, सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणाचा तपास सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सुरू असून, घटनाक्रम, पुरावे आणि आरोपीची भूमिका याबाबत अधिक तपास केला जात आहे.





