– क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासकेंद्राला टेंभेकर कुटुंबाकडून स्पर्धा परीक्षेची पुस्तके वितरित
तिरोडा :- बौद्ध धम्मात दान पारमितेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रागद्वेष विरहीत होवून, कसलीही अपेक्षा न करता नि:स्वार्थ भावाने समाजकल्याणासाठी केलेले दान हे धम्मदान असते. या दानाच्या माध्यमातून समाजाच्या, विहाराच्या विकासासाठी मदत होईल. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाकडे वाटचाल करणे सुगम होईल. त्यामुळे बुद्धाने सांगितलेली दान पारमिता प्रत्येकाने आत्मसात करून स्वतःमध्ये रुजवून घेणे अनिवार्य आहे. असे प्रतिपादन महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्रा. के.एफ. मेश्राम यांनी केले.
स्थानिक महाप्रज्ञा बुद्ध विहारात असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांना विहार समितीचे सदस्य लंकेश टेंभेकर यांनी रविवारी (दि.5) स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट दिली. तसेच विहारातील समाजपयोगी कार्यासाठी 5 हजार रुपयांचा धनादेश विहार समितीला दिला. यानिमित्त विहारातील संबोधि ध्यान कक्षात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना के.एफ. मेश्राम बोलत होते.
सुरुवातीला भंतेजींच्या उपस्थितीत सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली. उपासक लंकेश टेंभेकर यांच्या कुटुंबीयांकडून फळदान करण्यात आले. तसेच अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी प्रामुख्याने महाप्रज्ञा विहार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र बडगे, सचिव प्रवीण चव्हाण, सहसचिव महेंद्र वालदे, कोषाध्यक्ष संजय जांभूळकर, तक्षशिला विहार समितीचे सचिव बौद्धाचार्य रमेश नांदगाये, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव देवानंद शहारे, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहारे, प्रवीण नंदागवळी, लारेंद्र गेडाम, राहुल बडगे, सत्यवान चौधरी, सुधीर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
उपासक लंकेश टेंभेकर यांनी आजच्या काळातही आपल्या तीन भावंडाच्या कुटुंबांसह संयुक्त कुटुंब टिकवून ठेवले. तसेच गरिबीतून व्यवसायात उंच भरारी घेतली व समाजकार्यासाठी पुढाकार घेत आहेत. यापूर्वीसुद्धा त्यांनी समाज हितासाठी धम्मदान दिले आहे. याबद्दल सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. तसेच बुद्धाने सांगितलेल्या दान पारमितेचा ते आपल्या जीवनात यथायोग्य अवलंब करीत असल्याचे म्हटले.
प्रास्ताविक, संचालन व आभार महेंद्र वालदे यांनी मानले. या वेळी उपासक व उपासिका यांच्यासह मोठ्या संख्येने सावित्रीबाई अभ्यास केंद्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.




