spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाळ खरेदी करणाऱ्या महिलेसह मध्यस्थ ‘सागर सिक्का’ पोलिसांच्या जाळ्यात; ६ आरोपींचा असा उघडला डाव

हंसराज,प्रतिनिधी भंडारा वरठी :- भंडाऱ्याच्या वरठी पोलिसांनी एका मोठ्या आंतरजिल्हा नवजात बालक तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला असून, याप्रकरणी मुख्य सूत्रधार डॉक्टरसह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोंदिया येथील डॉ. नितेश नरेंद्रकुमार वाजपेयी याने आपल्या पदाचा गैरवापर करून एका १० दिवसांच्या चिमुकलीचा सौदा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस कारवाईच्या भीतीने डॉ. नितेश वाजपेयी याने स्वतःच्या पोटावर जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या डॉक्टरवर यापूर्वीही गोंदिया जिल्ह्यातील रामनगर आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, सध्या न्यायालयने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.

या प्रकरणाचा छडा महिला व बाल विकास विभागाच्या ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ मुळे लागला. २ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीवरून वरठी पोलिसांनी मोहाडी मार्गावरील कुशारी फाट्यावर नाकाबंदी करून संशयास्पद वाहन अडवले. त्यात पौर्णिमा सतीश धुर्वे (२०, रा. गोंदिया) आणि उमेषसिंग रामचंद्रसिंग गेहलोत (४८, रा. गोंदिया) हे दोघे एका नवजात बालिकेला घेऊन जाताना आढळले. अधिक तपासात या रॅकेटमधील सागर सिक्का (रा. गोंदिया) हा मुख्य दुवा असल्याचे समोर आले; तो बाळ विकणारे आणि घेणारे यांची भेट घडवून आणण्याचे काम करायचा. तसेच, डॉक्टरची मुख्य हस्तक ललेश्वरी नंदकिशोर सादेपाच (३९, रा. गोंदिया) हिच्या खात्यातून पैशांचे सर्व व्यवहार व्हायचे. बाळ खरेदी करणारी महिला मालती प्रकाश वाघमारे (४४, रा. पांढराबोडी) हिला देखील पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी बेड्या ठोकल्या आहेत.

सदर बालिकेच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, बाळ अशक्त असल्याने डॉक्टरने “नागपूरच्या सामाजिक संस्थेत मोफत उपचार करतो” असे खोटे सांगून बाळाला ताब्यात घेतले होते. या प्रकरणात सागर सिक्का, ललेश्वरी सादेपाच, पौर्णिमा धुर्वे आणि उमेषसिंग गेहलोत यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत (MCR) केली आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे या आंतरराज्य रॅकेटचा अधिक तपास करत असून, यामागे आणखी काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.