“मी पाहिलेले जननायक दादासाहेब कुंभारे” या स्मरणिकेचे शब्दांतून साक्षात उभे केले ‘जननायक’ दादासाहेब!” – ॲड. सुलेखा कुंभारे

0
46

– कामठीत ‘मी पाहिलेले जननायक दादासाहेब कुंभारे’ स्मरणिकेचे दिमाखदार प्रकाशन

– ऐतिहासिक सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती

कामठी :- “इतिहास घडवणारी माणसे विरळ असतात, पण तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचवणारे साहित्यिक आणि पत्रकार त्याहूनही महत्त्वाचे असतात. पत्रकार बंडू नारनवरे यांनी ‘मी पाहिलेले जननायक दादासाहेब कुंभारे’ या स्मरणिकेच्या माध्यमातून दादासाहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आपल्यासमोर सजीव केले आहे. ही स्मरणिका केवळ कागदांचा संग्रह नसून, तो एका सच्च्या कार्यकर्त्याच्या डोळ्यांनी पाहिलेला ‘साक्षात इतिहास’ आहे,” असे गौरवपूर्ण उद्गार माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी काढले.

निमित्त होते, कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या १०३ व्या जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘स्मरणिका प्रकाशन’ सोहळ्याचे. जागतिक कीर्तीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील ऑडिटोरियम सभागृहात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंचावर माजी आमदार मिलिंद माने, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिल हिरेकण आणि लेखक बंडू नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

दादासाहेबांचा विचार हाच भविष्याचा मार्ग: सुलेखा कुंभारे 

आपल्या अध्यक्षीय भाषणात सुलेखा पुढे म्हणाल्या की, “ज्या कामठीच्या मातीत दादासाहेबांनी समतेचे आणि संघर्षाचे बीज पेरले, त्या वृक्षाची फळे आज आपण चाखत आहोत. बंडूनी आज आपले उर्वरित आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित करण्याचा जो संकल्प केला, तो त्यांच्यातील खऱ्या निष्ठेचा पुरावा आहे. ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विडी कामगारांना न्याय दिला, त्या महापुरुषाचा वारसा जपणे हीच आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल. या स्मरणिकेच्या रूपाने दादासाहेबांचा संघर्ष आता घराघरात पोहोचेल.”

डॉ. अनिल हिरेकण (कुलगुरू): “स्मरणिका हे केवळ पुस्तक नसून तो एक जिवंत दस्तऐवज असतो. नव्या पिढीतील संशोधकांसाठी ही स्मरणिका मार्गदर्शक ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मिलिंद माने (माजी आमदार): “दादासाहेबांनी कामठीच्या भूमीत जे कार्य उभे केले, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब या स्मरणिकेत उमटले आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लेखक बंडू नारनवरे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. “आज मी जो काही आहे, तो केवळ दादासाहेबांमुळेच. त्यांनी देवदूत बनून माझा जीव वाचवला आणि मला पत्रकारितेची प्रेरणा दिली,” असे सांगताना त्यांनी या स्मरणिकेच्या लेखनाचा रात्रीचा प्रवास मांडला. ताईंच्या प्रेरणेमुळेच हे कार्य पूर्णत्वास गेल्याचे सांगत, त्यांनी आपले उर्वरित आयुष्य सुलेखाताईंच्या समाजकार्यात आणि धर्मकार्यात समर्पित करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला,

कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून तसेच पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राष्ट्रपाल मेश्राम व आभार प्रदर्शन रेखा भावे यांनी केले.

या कार्यक्रमाला ॲड. डी. सी. चहांदे, भीमराव फुसे, अजय कदम, उदास बंसोड, सुभाष सोमकुवर, अंकुश बांबोर्डे, राजेश गजभिये, अजित बागडे, भैयालाल भोयर, अमित चव्हाण, आनंद सायरे, अरविंद बोरघाटे, प्रभाकर ढोके, सागर भावे, महेश सोमकुवर, विलास बंसोड, सुकेशीनी मुरारकर, रेखा भावे, रजनी लिंगायत, सावला सिंगाडे, रंजना नारनवरे, अंबरीन फातीमा, संगीता अग्रवाल, वंदना आळे, दिशा पिल्ले, प्रांजल सोमकुवर, सुनंदा रामटेके, विशाखा फुलझेले तसेच कामठी परिसरातील नागरिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.