नागपूर १० – माणकापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी पहाटे मोठी कारवाई करत हॉटेल डिवाइनमध्ये राहणाऱ्या तिघांना एमडी (मेफेड्रोन) पावडरसह अटक केली. या तिघांकडून एकूण ३८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३.८ लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी रूम क्रमांक १०२ आणि १०३ मध्ये धाड टाकून अदनान सरवर खान (२३), तौसिफ मतीन शेख (२४) आणि मो. सजील हुन्नानी (२५) या तिघांना अटक केली. अदनानकडून २१ ग्रॅम (₹२.१० लाख), तर तौसिफकडून १७ ग्रॅम (₹१.७० लाख) एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. याशिवाय ₹१,०१० रोख आणि MH-31/EA0350 क्रमांकाची पांढरी फोर्ड कार देखील जप्त करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी हे ड्रग्ज हसनबाग येथील मोहम्मद ओवैश शेख आणि ताजबाग येथील साहिल मेमन यांच्याकडून घेतल्याची माहिती दिली असून, आर्थिक फायद्यासाठी ते विकत असल्याची कबुली दिली. माणकापूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




