– शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन; ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ मंत्राचा जिल्हाप्रमुखांनी दिला संदेश
हंसराज,भंडारा बेटाळा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका मोहाडीच्या वतीने दोन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, ३० मे रोजी रात्री ८ वाजता या स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा संघटक लवकुश निर्वाण यांच्या हस्ते झाले, तर जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे यांची सहउदघाटक म्हणून प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाळासाहेबांनी ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मूलमंत्र दिला होता. आज राजकारणाची दिशा बदलली असली, तरी सामान्य शिवसैनिक आजही याच तत्त्वावर ठाम आहे. २०२६ हे शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने भंडारा जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेटाळा येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे.”
दिग्गजांची मांदियाळी: या सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, प्रमोद मेश्राम, ईश्वर भोयर, मधु बुरडे, शहर प्रमुख राकेश आग्रे, प्रवीण गुप्ता, उपतालुकाप्रमुख गोवर्धन मारवाडे, कैलास कनपटे, प्रवीण गायधने, सत्यनारायण कामथे, अनिल माहुले, विभागप्रमुख गजानन लिल्लारे, महिपाल वहिले, निखिल बशीने, सुरणकर, माजी तालुकाप्रमुख व बेटाळ्याचे माजी सरपंच रामसिंग बैस, माजी तालुकाप्रमुख हंसराज आगाशे, युवासेना साकोलीचे विक्रांत मेश्राम आणि बेटाळ्याच्या सरपंच रेश्मा ताई ईश्वरकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच वादळ आणि पावसाचे सावट होते, मात्र आयोजकांनी चोख व्यवस्था करून या संकटावर मात केली. बेटाळा आणि परिसरातील युवकांमध्ये या स्पर्धेबाबत मोठा उत्साह दिसून आला. आज स्पर्धेचा अंतिम दिवस असून, विजयी संघांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख गजानन लिल्हारे, शाखाप्रमुख विलास बुरडे, लक्ष्मण पवनकर, सुभाष मते, प्रवीण रामटेके, विजय ठोंबरे, अनिकेत राऊत, प्रकाश नेरकर, शुभम भुरले यांसह अनेक शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.








