हंसराज,भंडारा साकोली :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. साकोली पोलिसांनी सासरा रेतीघाट आणि चुलबंद नदीपात्रात धडक कारवाई करत रेतीची चोरटी वाहतूक करणारी तीन वाहने पकडली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर आणि एका मिनी ट्रकसह एकूण ३८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साकोली पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंगवर असताना त्यांना सासरा रेतीघाट आणि चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह सापळा रचला.

पहिली कारवाई: पोलिसांनी सासरा रेतीघाट शिवारात विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा ‘स्वराज ७४२ XT’ ट्रॅक्टर पकडला. यामध्ये नितेश बंडू गिलोरकर (२८, रा. मुरमाडी/तुपकर) आणि ७५ वर्षीय वृद्ध आरोपी भास्कर नारायण फुंडे (रा.सोनमाळा) हे रेतीची चोरटी वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडून ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई: याच परिसरात पोलिसांनी दुसऱ्या एका ट्रॅक्टरवर छापा टाकला. आरोपी शिशुपाल परशराम नेवारे (३७, रा. सोनमाळा) हा ‘महिंद्रा ४१५ DI’ (क्रमांक MH 35 AG/828) या ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती नेताना रंगेहात पकडला गेला. त्याच्याकडूनही ८ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
तिसरी मोठी कारवाई: साकोली पोलिसांनी सासरा गावाजवळ तिसरी मोठी कारवाई केली. यामध्ये आरोपी जीवन मारोती चाचेरे (३८, रा. खंडाळा) आणि दीपक अशोक चांदेवार (३१, रा. सासरा) हे ‘अशोक लेलँड’ कंपनीच्या मिनी ट्रकद्वारे (क्रमांक MH 36 AA 4650) कोणतीही परवानगी नसताना दोन ब्रास रेतीची वाहतूक करत होते. या कारवाईत २२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे: या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (ई) आणि ४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूर आणि पोलीस निरीक्षक आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राऊत, पोलीस शिपाई थुलकर आणि कोटवार यांनी यशस्वी केली. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.








