हंसराज प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या हरदोली (सि.) येथे शेतात बांधलेल्या 2 बैलांना वाघाने ठार केल्याची घटना दि.9 जानेवारी रोज शुक्रवारला सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून कैलास मारुती पटले असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे.
नेहमी प्रमाणे कैलास मारोती पटले हे गावाशेजारी असलेल्या शेतात गुरांच्या गोठ्यात त्यांनी आपले बैल बांधले होते. मात्र गोट्यात रात्रीच्या सुमारास वाघाने दोन बैलांना ठार केले. शेतकरी दररोज प्रमाणे बैलांना गोठ्यातून बाहेर काढण्यासाठी शेतावर गेले असता, दोन्ही बैल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. दोन्ही बैलांना वाघाने ठार मारल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे हरदोली-सिहोरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित वन विभागाने व शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








