– नागपूर परिमंडलातील ग्राहकांना 3 महिन्यांत 73 लाखांची सवलत
नागपूर :- महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिवसा वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट 80 पैशांची सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला फक्त टाइम ऑफ डे (टीओडी) मीटर बसवून घ्यावा लागेल. नागपूर परिमंडलात, आतापर्यंत 3 लाख 54 हजार 429 ग्राहकांनी टीओडी मीटरचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना जुलै ते सप्टेबर या तीन महिन्यात तब्बल 73 लाख 12 हजार 186 रुपयांची सवलत मिळाली आहे.
यात नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांना 65 लाख 82 हजार 711 तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांना 7 लाख 29 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी हे मीटर लावले आहेत, त्यांचे वीजबिल कमी येण्यास मोठी मदत झाली आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडलात टीओडी मीटरचा वापर करून वीजबिलात सवलत घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.जुलै महिन्यात नागपूर जिल्ह्यातील 88 हजार 737 ग्राहकांना 7 लाख 13 हजार 825, ऑगस्ट महिन्यात 1 लाख 21 हजार 745 ग्राहकांना 22 लाख 77 हजार 70 तर सप्टेंबर महिन्यात 2 लाख 18 हजार 211 ग्राहकांना 35 लाख 91 हजार 815 रुपयांची सवलत मिळाली आहे. तर, वर्धा जिल्ह्यातील जुलै महिन्यात 11 हजार 176 ग्राहकांना 69 हजार 790, ऑगस्ट महिन्यात 9 हजार 153 ग्राहकांना 1 लाख 7 हजार 872 तर सप्टेंबर महिन्यात 35 हजार 844 ग्राहकांना 5 लाख 51 हजार 872 रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून सर्वत्र हे मीटर लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून बिलींग सायकलप्रमाणे टीओडी वीजदराची सवलत मिळविणा-या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अचूक बिल, तक्रारी कमी!
टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वापराप्रमाणे अचूक वीजबिल मिळत आहे. यामुळे सरासरी वीज बिल आणि सदोष मीटरमुळे येणाऱ्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. वापराएवढेच अचूक बिल देणाऱ्या या स्मार्ट टीओडी मीटरसाठी नागपूर परिमंडलात 654 ग्राहकांनी स्वतःहून महावितरणकडे मागणी केली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 463 तर वर्धा जिल्ह्यातील 91 ग्राहकांचा समावेश आहे.
सवलत 1 रुपयांपर्यंत वाढणार!
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी माहिती दिली की, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरल्यास चालू आर्थिक वर्षात प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळत आहे आणि टप्प्याटप्प्याने ही सवलत 1 रुपयापर्यंत वाढणार आहे. यामुळे ग्राहकाच्या वीजबिलात थेट मोठी बचत होणार आहे.
टीओडी मीटर मोफत!
महावितरण हे टीओडी मीटर ग्राहकांना पूर्णपणे मोफत बसवून देत आहे. ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. हे मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्याचे मासिक रीडिंग आपोआप घेतले जाते, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज राहत नाही आणि वेळेत बिल मिळते.
वीजबिलात बचत आणि अचूक बिलिंगच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.




