◼️स्थानिका कडून अवैध वसुलीच्या आरोपावरून वाद
◼️नागपूर-जबलपूर महामार्गावर दोन तास वाहतूक विस्कळीत
सचिन चौरसिया, रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कांद्री चेकपोस्टवर ट्रकचालकाला मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर संतप्त ट्रकचालकांनी महामार्गावर ट्रक उभे करून आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कांद्री चेकपोस्टवरील ट्रकचालकांच्या मारहाणीच्या घटनेनंतर ट्रकचालकांनी अवैध्य वसुलीच्या आरोपानुसार उभे करून विरोध दर्शविला. चेकपोस्टवर काही स्थानिक व्यक्तींकडून ट्रकचालकांकडून अवैधरीत्या पैशांची वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. दरम्यान इतर ठिकाणचे चेकपोस्ट बंद असताना कांद्री चेकपोस्ट सुरू का आहे, अशी विचारणा केल्याने वाद निर्माण झाला. यानंतर संबंधित व्यक्तींनी ट्रकचालकाची कॉलर पकडून त्याला ट्रकमधून खाली खेचत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या इतर ट्रकचालकांनी महामार्गावर ट्रक उभे करून आंदोलन सुरू केले.
चेकपोस्ट बंद करण्याची मागणी
वादविवादाच्या पार्श्वभूमीवर ट्रकचालकांनी कांद्री चेकपोस्ट बंटव करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.



