– सात गंभीर जखमी; पाच जणांची प्रकृती चिंताजनक
गोंदिया :- गोंदियाच्या देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ५३ वरील भर्रेगाव फाट्याजवळ बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने देवरीकडे येणाऱ्या ई-रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ई-रिक्षाचालकासह शाळकरी विद्यार्थी असे एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जखमींमध्ये अनन्या भाऊराव चुटे (१९, रा. कुंभारटोला), भानबाई मडावी (४०, रा. भर्रेगाव), वेदिका संजय गाते (१३, रा. शिरपूर), हर्षिका राजेंद्र सराटे (१७, रा. कुंभारटोला), गुंजन भाऊराव चुटे (१७, रा. कुंभारटोला), युक्तिका संजय गाते (४, रा. शिरपूर), देवेंद्र संपत सरोटे (४५, रा. शिरपूर) हे गंभीर जखमी झाले. यापैकी पाच जणांना गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.
अशी घडली घटना
बुधवारी सकाळी शिरपूर येथून काही शाळकरी विद्यार्थी आणि एमएच-३५/एच- २२०३ क्रमांकाच्या प्रवासी ई-रिक्षामध्ये बसून देवरीकडे येत होते. भर्रेगाव फाट्याजवळ महिलेला बसविल्यानंतर ई-रिक्षा जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर आला. तेव्हाच मागून येणाऱ्या सीजे-०८/एझेड-२४५१ या भरधाव क्रमांकाच्या ट्रकने ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ई-रिक्षा जागीच उलटली. यामुळे आतील सर्व सात प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.
ट्रॉमा केअर युनिटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
देवरी येथील ग्रामीण रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या परिसरात दररोज लहान-मोठे अपघात घडत असतात. मात्र, रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याने अपघातग्रस्तांना नेहमीच गोंदिया येथे रेफर केले जाते. या प्रवासात अनेकदा उपचाराअभावी रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. देवरीसाठी तब्बल ४० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर युनिटचे साहित्य सध्या गोंदिया येथे वापरले जात आहे. त्यामुळे ट्रॉमा केअर युनिटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
डॉक्टरांची कमतरता आणि आरोग्यमंत्र्यांचा दौरा
आजच्या अपघातातील सातही जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला सेवेत नसलेल्या डॉक्टरांना पाचारण करावे लागले. यावरून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे आणि आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या रुग्णालयात कार्यरत असलेले तज्ज्ञ सिव्हिल सर्जन आनंद गजभिये यांना नवेगावबांध येथे प्रतिनियुक्तीवर कोणत्या नियमा अंतर्गत पाठविण्यात आले आहे, हे गुलदस्त्यात आहे. योगायोगाने, अपघाताच्या दिवशीच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी देवरी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. या पार्श्वभूमीवर, ट्रॉमा केअर युनिटचे कार्यान्वयन आणि डॉक्टरांच्या कमतरतेकडे आरोग्यमंत्री गांभीर्याने लक्ष देणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.






