spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर: अवैध मोहा सडवा साठवणुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध दारू गाळणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पिपरा जंगल शिवारात छापा टाकून ७२ हजार रुपये किमतीचा ३६० किलो सडवा मोहाफास जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई गभने यांना पिपरा जंगल शिवारातील ‘मंगी ढोडा’ नाल्याजवळ अवैध रित्या मोहा सडवा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत आरोपी ईश्वर नारबा बडवाईक (वय ३३ वर्षे, रा. पिपरा, ता. तुमसर) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता, आरोपीच्या ताब्यातून १२ प्लास्टिकच्या चुंगळ्यांमध्ये (पोत्यांमध्ये) भरलेला ३६० किलो सडवा मोहाफास आढळून आला. प्रत्येक पोत्यात ३० किलो मोहामाल असून त्याची एकूण किंमत ७२,००० रुपये इतकी आहे. हा माल अवैध रित्या दारू गाळण्यासाठी साठवून ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक ३०९/२०२४, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गभने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Popular Articles