spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांचा अवैध हातभट्टीवर दणका; १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

– मेहगाव शिवारात पोलिसांची मोठी कारवाई; एकावर गुन्हा दाखल

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मेहगाव शिवारामध्ये पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवलेल्या मोहाफुलाच्या सडव्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई बावणे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मेहगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टीसाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मेहगाव शिवारात छापा टाकला.

या कारवाईत दुर्गेश सुभाष तलमले (वय ३३ वर्ष, रा. मेहगाव, ता. तुमसर) हा संशयित आरोपी आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष जागेची पाहणी केली असता, तिथे ४० किलोच्या बॅगमध्ये भरलेला एकूण १७२० किलो मोहाफूल सडवा आढळून आला. १०० रुपये किलो या दराने या मुद्देमालाची एकूण किंमत १,७२,०००/- रुपये इतकी आहे. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ८३१/२०२५, कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सयाम, पोलीस शिपाई बावणे व तुमसर पोलीस पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.