हिंगणा १९ : हिंगणा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी तत्पर आणि परिणामकारक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण २१,०४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिर, खामगाव देवडी परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाणे हिंगणा, नागपूर शहर येथे अप.क्र. 290/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305(डी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी सावंगी खदान परिसरातून दोन संशयित आरोपी पियुष हरिश्चंद्र कावडे (वय २४, रा. देवडी, आमगाव, ता. हिंगणा) आणि चेतन अंकुश कावळे (वय २१, रा. देवडी, आमगाव, ता. हिंगणा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी दानपेटी (किंमत ७०० रुपये) आणि त्यामध्ये असलेली रोख रक्कम २०,३४८ रुपये असा एकूण २१,०४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ १ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त एमआयडीसी विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड, तसेच पोलीस शिपाई अनिल (6381) व संजीव (6381) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली असून या पोलिसी दक्षतेमुळे मंदिर परिसरात नागरिकांमध्ये विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.



