पारशिवणी :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण आणि रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवणी पोलीसांनी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे दाखल गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात परत पाठविण्याच्या प्रक्रियेसाठी दिनांक १६/११/२०२६ रोजी रात्री बीएसएफ कॅम्प, कृष्णनगर पश्चिम बंगाल येथे दाखल करण्यात आले.
सदर बांगलादेशी नागरिकांची नावे १) रूना बेगम उर्फ आयेशा मोहम्मद लहू शेख, वय २५ वर्षे, रा. बिस्तपूर, पोस्ट पडोली, थाना कालीया, जिल्हा नराईल, बांगलादेश आणि २) मोहम्मद लहू शेख, वय २९ वर्षे, रा. बिस्तपूर, पोस्ट पडोली, थाना कालीया, जिल्हा नराईल, बांगलादेश अशी आहेत. सदर आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अप. क्र. ९५/२०२४ अन्वये पासपोर्ट अधिनियम १९५० चे कलम ६(अ), ३ (अ), विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४(१) (इ) तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३३६(२), ३४०(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर येथे मा. न्यायाधीश के. एच. ठोंबरे यांच्या न्यायालयात झाली. दिनांक ३१/०८/२०२६ रोजी न्यायालयाने आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २५८ (२) अन्वये यापूर्वी भोगलेल्या २ वर्षे ५ महिने १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा ग्राहय धरून प्रत्येकी १०,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आरोपींना बांगलादेशात परत पाठविण्याच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.






