– दोन आरोपी अटकेत, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
कन्हान :- मध्य प्रदेशातुन नागपुरच्या दिशेने अवैधरित्या कत्तलीसाठी दोन गोवंश घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला पशुप्रेमी तरुणांनी पाठलाग करून पकडले. त्यानंतर वाहन कन्हान पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन पिकअप वाहनासह एकुण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पशुप्रेमीं च्या सतर्कतेमुळे दोन गोवंशांना जीवनदान मिळाले.
प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.१२) सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता टेकाडी बसस्थानका जवळ पशुप्रेमी तरुणांना नागपुर-जबलपुर महामार्गा वर मध्य प्रदेशकडुन नागपुरच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमपी ३५-जीए-०२४१ संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना दिसले.तरुणांनी वाहनाचा पाठलाग करून कन्हान पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वाहतुक अधिकारी अनिल यादव यांनी तत्परता दाखवत तारसा चौक येथे नाका बंदी केली. यावेळी संशयास्पदरीत्या येणारे सदर पिकअप वाहन पोलिसांनी थांबवुन तपासणी केली. वाहना मध्ये दोन इसम आढळुन आले. चौकशीत चालक किरण भोजलाल उईके (वय २३), तर सोबत सौरभ धरमदास चौधरी दोघेही रा. कुडोपाल, पोस्ट पोनिया, तहसिल बरघाट, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश, असे सांगितले. पोलिसांनी वाहनातील गोवंशाबाबत खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र तसेच वाहतुकीचा परवाना मागितला असता आरोपींकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे समोर आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक काळ्या रंगाची जर्सी गाय आणि एक लाल रंगाची गाय अशा दोन मोठ्या गोवंशांना कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था नसताना कोंबुन नेण्यात येत असल्याचे आढळले.
गोवंश कुठे व कोणत्या उद्देशाने नेण्यात येत आहे, या बाबत चालकाकडुन समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे गोवंश कत्तलीसाठी नेला जात असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेतले. कारवाईत अंदाजे ४ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन आणि ३० हजार रुपये किमतीचे दोन गोवंश असा एकुण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गोवंशांना उपचार व निवाऱ्याची आवश्यकता असल्याने त्यांना निमटोला गोवंशशाळा, देवलापार येथे सुरक्षि तपणे पाठविण्यात आले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ब), (क), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ)(१)(२), ९ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४, १९ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. पशुप्रेमी तरुणांच्या सतर्कतेमुळे वेळेत झालेल्या या कारवाईमुळे दोन गोवंशांना जीवदान मिळाले असुन कन्हान पोलिसांच्या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.





