५ महिला जखमी
धानाची रोवणी करतांना पडली विज
२५ महिला होत्या रोवणी कामावर
रामटेक १९ : तालुक्यातील सोनेघाट शेतशिवारातील एका शेतामध्ये धानाची रोवणी करीत असतांना विज पडुन दोन महिलांचा जागीच मृत्यु तर पाच महिला जखमी झाल्याची घटना आज दिनांक १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारात घडली. जखमी महिलांना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल करण्यात आलेले आहे.
तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश जगन्नाथ राहते यांचे मौजा सोनेघाट ता. रामटेक येथील शेत सर्वे क्रमांक १७९/४ शेत असुन तेथे २५ महिला धानाची रोवणी करीत होत्या. दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास महिला जेवण करीत असतांना अचानक वीज पडल्याने त्यापैकी दोन महिला नामे मंगलाबाई जीवन मोटघरे वय ४० वर्ष रा. मानापुर ता.रामटेक व वर्षा देवचंद हिंगे वय ३३ वर्षे रा.भोजापुर ता. रामटेक या दोघींचा जागीच मृत्यू झाला असून ५ महिला जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या महिलांमध्ये जयश्री आकाश जवादे वय ३० वर्ष रा. रामाळेश्वर वॉर्ड रामटेक, रंजू राजू अष्टेकर वय ३८ वर्ष रा. रामाळेश्वर वॉर्ड रामटेक, कलाबाई कवडू वरघणे वय ६० वर्ष, प्रमिला वासुदेव आष्टनकर वय ४९ वर्ष रा भोजापुर ता. रामटेक, वनिता गजानन नागरीकर वय ५५ वर्ष रा. रामाळेश्वर वॉर्ड रामटेक या महिला वीज पडल्याने जखमी झाल्या असून त्यांचे उपचार उपजिल्हा रुग्णालय रामटेक या ठिकाणी सुरू आहे. मृतकांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून या वार्ताने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
रोवणी कामावर महिलांचे जत्थे
रामटेक तालुक्यात धानाची रोवणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. धान्याचा पट्टा म्हणून या भागाला ओळखण्यात येते. तेव्हा या क्षेत्रामध्ये धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे धान रोहिणीसाठी मोठ्या प्रमाणात विशेषतः महिला मजुरांची शेतकऱ्यांना आवश्यकता असते. धान रोवणी कामाची दिवसाची मजुरी सुद्धा अडीचशे ते तीनशे रुपये रोज दरम्यान असल्यामुळे या कामासाठी सर्व भागातून मोठ्या प्रमाणात महिलांचे जत्थे शेतामध्ये जात असतात.


