spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

यवतमाळ महोत्सवात उमेदची ‘समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी; महिला स्वयं-सहाय्यता गटांचे १२० स्टॉल्स

– जिल्हाधिकारी विकास मीना यांची भेट व पाहणी

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदमार्फत या वर्षीची ‘समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी’ ही यवतमाळ महोत्सवात भरविण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये महिला स्वयं-सहाय्यता गट, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच स्वेप आणि आरसेटीअंतर्गत घडलेल्या उद्योजकांचे तब्बल १२० स्टॉल्स उभारण्यात आले असून या स्टॉल्सना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच काही गृहोपयोगी वस्तूंची खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

उमेदची ही ‘समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी’ अधिक व्यापक, भव्य आणि समन्वयात्मक स्वरूपात उभी राहिली आहे. उमेद अभियानाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाअंतर्गत घडलेले उद्योजक हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. मागील वर्षी याच मिनी सरस प्रदर्शनीत महिला गटांनी तब्बल 54 लाख रुपयांची उलाढाल केली होती. यंदा त्याहून अधिक विक्री व नवीन बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास या प्रदर्शनातील महिलांनी व्यक्त केला आहे.

उमेदच्या माध्यमातून ‘बचत गट ते उद्योजक’ आणि ‘गाव ते जागतिक बाजारपेठ’ असा प्रवासाचा टप्पा गाठण्यासाठी महिलांना जिल्हा प्रशासन संपूर्ण सहकार्य करणार असून यवतमाळकरांनी देखील या ‘समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी’ला भेट देवून खरेदी करावी व महिलांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.

मिनी सरस प्रदर्शनीला वाढता प्रतिसाद

यवतमाळ महोत्सवात उमेदमार्फत 27 मार्चपासून भरविण्यात आलेल्या ‘समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी’ला यवतमाळकरांचा प्रतिसाद वाढतांना दिसत आहे. या प्रदर्शनीत विशेषत: महिला गृहिनींचा गृहोपयोगी वस्तू आणि मसाल्यांचे पदार्थ खरेदी करण्याकडे कल वाढत आहे.

Popular Articles