spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चाचेर तहानलेले: पेंचचे पाणी द्या, नाहीतर पाण्याअभावी जनावरे दगावण्याची शक्यता – सरपंचा लुंबिनी महेश कलारे

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील चाचेर गावात उन्हाळ्याने रौद्ररूप धारण केले असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातून वाहणारी सांड नदी व गावातील सर्व तलाव, विहिरी, बोरवेल पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे गुरे-वासरे, शेळ्या-मेंढ्या व वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. पाण्याअभावी जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत चाचेरच्या सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नागपूर व रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना पत्र पाठवून पेंच प्रकल्पाच्या कामठी खैरी धरणातून सांड नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

गावातील हवालदिल शेतकरी सुरेश खंडाइत, प्रल्हाद काळे, योगराज घरपडे, नीलकंठ बावनकुळे, विलास बरबटे, चक्रधर घिवतोंडे, बंडु देशमुख, ओमकार महादूले, सुरेंद्र टेम्भरे, प्रकाश काळे, भोला बावनकुळे, अनंता काळे,वासुदेव सोमकुवर, प्रभाकर दरवई यांनी सांगितले की, “विहिरींना थेंबभर पाणी नाही. जनावरांना 3-4 किमी लांब पेंच कालव्यावर न्यावे लागते. सांड नदीत पाणी सोडले तर गावातील 500 पेक्षा जास्त गुरे व शेळ्या-मेंढ्यांची सोय होईल.

चाचेर शिवार हे जंगलाला लागून असल्याने हरीण, रानडुक्कर, माकड, नीलगाय यासारखे वन्यप्राण्यांना पुरेसा मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांचेही हाल होत असून पाण्याच्या शोधात वस्तीत शिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचेही नुकसान होत आहे.

“पाणी केवळ पिण्यासाठी व जनावरांसाठी मागितले आहे. शेतीसाठी उपसा होणार नाही याची ग्रामपंचायत पूर्ण दक्षता घेईल. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही निवेदन दिले आहे. खासदार बर्वे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घालावे,” अशी कळकळीची विनंती सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांनी केली आहे.

प्रशासनाने तातडीने पाणी सोडावावे अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.