spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत हवामानाचा अनपेक्षित बदल, वाहतुकीवरही परिणाम होणार

नागपूर :- महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असून तापमानात चढ-उतार जाणवतील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण कायम राहणार असून उत्तर भारतात झालेल्या तापमनातील घटीचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी, गारठ्याची तीव्रता काही भागांत अधिक जाणवू शकते.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, निफाड, परभणीसारख्या भागांत रात्रीच्या तापमानात यापेक्षा अधिक घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडीचा प्रभाव वाढल्यास शेती आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत तापमानात काहीसा चढ-उतार राहणार आहे. येत्या २४ तासांत सकाळी आणि दुपारी सूर्यप्रखरतेमुळे उष्णतेचा तडाखा जाणवेल, मात्र दुपारनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यातही अशीच परिस्थिती राहणार असून पहाटे व रात्री थंडीचा प्रभाव वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात एकूणच सौम्य तापमानवाढ दिसून येत असली, तरी उत्तर महाराष्ट्रात पारा एक ते दोन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर होऊ शकतो.

धुके, थंडीची लाट आणि उत्तर भारताचा प्रभाव…

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील उंचावरील भागांत ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पावसाचा, तर काही भागांत बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या तीव्र थंडीच्या काळामुळे तापमानात मोठे चढ-उतार होत आहेत. उत्तर भारतात थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असून तीन ते पाच जानेवारीदरम्यान दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात भीषण धुक्याची स्थिती निर्माण होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसाठी धुक्याचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात किनारपट्टी भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वाहतुकीवर परिणाम होणार…

धुक्याचा यलो अलर्ट असल्यामुळे रेल्वे, हवाई तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही रेल्वे गाड्या रद्द होण्याची किंवा उशिराने धावण्याची शक्यता असून विशेषतः उत्तर भारतातून महाराष्ट्र व देशातील इतर भागांकडे ये-जा करणाऱ्या रेल्वेसेवांवर त्याचा अधिक परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Popular Articles