कामठी :- रायपूर (छत्तीसगड) येथील के.एस.जे.पी. राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाज आणि त्यांच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज येथील सिंधी समाजबांधवांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला.
बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवत येथील सिंधी समाजसेवा संस्था आणि विविध सिंधी सामाजिक संस्थांनी मोर्चा काढला. मोर्चाच्या निर्धारित मार्गावर असलेले नेताजी चौकातील नेताजी सुभाष चंद्र बोस व छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सिंधू समाज भवनातून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून येथील जुना पोलिस स्टेशन व नंतर नवीन पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला. दरम्यान शिष्टमंडळाने जुना कामठी पोलिस स्टेशन व नंतर नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन दिले व बघेल यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाजाबद्दल अपमानकारक विधान केले. यामुळे संपूर्ण सिंधी समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांना ठेच पोहोचली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण सिंधी समाजाचा सन्मान आणि श्रद्धास्थानांचा अपमान झाला आहे.
यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात बघेल यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच बघेल यांनी आपल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून स्पष्ट धोरण आखावे आणि सिंधी समाजाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. येथील सिंधी समाजाने प्रशासनाला आवाहन केले आहे की, धार्मिक सौहार्द अबाधित ठेवण्यासाठी आणि समाजातील शांतता टिकवण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मोर्चाच्या निमित्ताने शहरातील सर्वच समाजबांधवांनी आज आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आपला आक्रोश दर्शविला होता.
या मोर्च्यात डॉ. हिरानंद दीपानी, संतुमल झमतानी, सुरेश चावला, अशोक चावला, विवेक मंगतानी, सुनील खानवानी, डॉ. राजेश दिपानी, डॉ. मनोज गुरुदासानी, विनोद वाधवानी, अमर चावला, वेद बंसवाणी, मुकेश सतीजाणी, विमल झमतानी आदींसह अनेक समाजबांधवांचा समावेश होता.








