नागपूर, दि. २६ – थॅलेसिमिया व सिकलसेल सारख्या गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या योद्ध्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नागपूरच्या छत्रपतीनगर येथील रेडिसन हॉटेलच्या शेजारी दुपारी होणार असून, या विशेष प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून वारियर्सना सन्मानित करतील.
कार्यक्रमाची माहिती देताना थॅलेसिमिया अँड सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी म्हणाले की, “या रुग्णांना सातत्याने शारीरिक आव्हानांचा सामना करावा लागतो, तरीही ते हार मानत नाहीत. आपल्या निर्धार आणि संघर्षातून हे योद्धे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.”
डॉ. रुघवानी यांनी सांगितले की, अनेक थॅलेसिमिया व सिकलसेल वारियर्सनी आरोग्याशी संबंधित मर्यादा असूनही शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी व त्यांच्या परिश्रमांचा गौरव करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
संस्था सातत्याने या आनुवंशिक रक्तविकारांबाबत जनजागृती करण्याचे आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी कार्यरत आहे.
या हृदयस्पर्शी सन्मान सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे, “संघर्षापेक्षा मोठा आहे साहस” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे. हा कार्यक्रम दाखवून देईल की, कशाप्रकारे हे वारियर्स आपल्या कठीण परिस्थितींवर मात करून धैर्य, जिद्द आणि प्रेरणेची नवी उंची गाठत आहेत.



