spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवकाळीचा फटका: भंडारा जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवर पिकांची दाणादाण; १७,२६० हेक्टर क्षेत्र बाधित

– कृषी विभागाचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल सादर; साकोली आणि लाखनी तालुक्याला सर्वाधिक फटका

हंसराज, प्रतिनिधी भंडारा  : भंडारा जिल्ह्यात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक नजर अंदाज अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण १७ हजार २६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय नुकसानीचा तपशील (अंदाजित हेक्टरमध्ये):

कृषी विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक नुकसान साकोली तालुक्यात झाले आहे.

साकोली: ४,६६८ हेक्टर

लाखनी: ४,०४५ हेक्टर

मोहाडी: ३,४०५ हेक्टर

लाखांदूर: २,३८८ हेक्टर

भंडारा: १,५९८ हेक्टर

तुमसर: ६६२ हेक्टर

पवनी: ४९४ हेक्टर

एकूण बाधित क्षेत्र: १७,२६० हेक्टर

पंचनाम्यानंतर आकडेवारी बदलणार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी हा प्राथमिक अंदाज अहवाल जिल्हाधिकारी आणि विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर यांना सादर केला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे नुकसान केवळ प्राथमिक अंदाजावर आधारित आहे. शेतात प्रत्यक्ष जाऊन सर्व्हेक्षण आणि पंचनामे केल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी आणि बाधित शेतकऱ्यांची नेमकी संख्या स्पष्ट होईल. त्यामध्ये बदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.