नागपूर :- नागपूर महानगरपालिका, क्रीडा भारती नागपूर महानगर, राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुरेश भट सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून खेळाकडे आकर्षित होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, क्रीडा भारतीचे अध्यक्ष अविनाश देशमुख, नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. संभाजी भोसले, राजमुद्रा प्रतिष्ठानचे सचिव विवेक अवसरे, क्रीडा आघाडीचे अध्यक्ष पद्माकर चारमोरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या विमला देशमुख, क्रीडा अधिकारी माया दुबडे आणि दर्शना युतीकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना दयाशंकर तिवारी यांनी मोबाईलच्या अतिवापरावर चिंता व्यक्त केली. “आजची मुले खेळांपासून दूर जात आहेत आणि मोबाईल या राक्षसाने त्यांचे बालपण गिळंकृत केले आहे,” असे ते म्हणाले. एकाच घरात असतानाही कुटुंबातील सदस्य मोबाईलमध्ये व्यस्त असतात, हे वास्तव त्यांनी समोर आणले. मोबाईलपासून दूर राहण्यासाठी खेळांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पियुष आंबुलकर यांनी केले, तर संतोष साकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकार:
या स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग, कुडो, युन्गमूडो, सिलम्बम, युनिफाईट, बुडो मार्शल आर्ट, वोविनाम, बेल्ट रेसलिंग, जंप रोप, तेंग सू डो, जीत कुने डो, आष्टे डू आखाडा, थांग ता, स्पीड बॉल, थाई बॉक्सिंग, फ्लोअर बॉल, मिनी गोल्फ, टिकॉक बॉल, लंगडी, कॉर्फ बॉल, वूड बॉल, टॅग ऑफ वार, फुटसल, फुटबॉल टेनिस, ड्रॉप बॉल अशा एकूण २५ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या स्पर्धांमध्ये ३५०० खेळाडू आणि ५०० पंच असे एकूण ४००० स्पर्धक सहभागी झाले असून, विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार असून, यामध्ये ८००० ते ९००० खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अश्फाक शेख, संदेश खरे, विवेक शाहू, अंकुश घाटे, तसेच केतन ठाकरे, हरीश चौबे, किरण यादव, सुधीर कहाणे, सीमा कापसे, सुनीता धबाडे, प्रशांत देशपांडे, अभिषेक देशपांडे, प्रमोद जांभूळकर,अश्विनी नागुलवार, संजय बाटवे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.




