spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भात, कापूस, तूर पिकात चिकट सापळ्यांचा वापर

◼️रोग-किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय

◼️किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सचिन चौरसिया, रामटेक :- भात, तूर आणि कापूस पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. यात निळे व पिवळे चिकट सापळे हे किडींच्या प्रभावी निरीक्षणसाठी आणि नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांकडे मावा, पांढरी माशी, तुडतुडे आणि इतर रसशोषक किडी आकर्षित होतात. कापूस पिकामध्ये विशेषतः रसशोषक किडींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. निळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा उपयोग प्रामुख्याने फुलकिडे (थ्रिप्स) यांच्या निरीक्षण व नियंत्रणासाठी केला जातो. पिकामध्ये सापळे योग्य उंचीवर लावल्यास प्रौढ किडी त्यावर चिकटून अडकतात. शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून सापळ्यांवर आढळणाऱ्या किडींची संख्या तपासावी. किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पुढील उपाययोजना कराव्यात. अनावश्यक कीटकनाशक फवारण्या टाळून एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक उपाय आणि आवश्यकतेनुसार रासायनिक नियंत्रण यांचा योग्य समन्वय साधण्याचे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी शाश्वती डोफे व समुह सहाय्यक धनश्री निघोट यांनी केले आहे. निळे व पिवळे चिकट सापळे हे कमी खर्चात पिकाचे संरक्षण करण्यासाठी उत्पादकांनी या तंत्रज्ञानाच्या वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रोग नियंत्रणासाठीही अप्रत्यक्ष फायदा

चिकट सापळे हे मुख्यतः किडींचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी वापरले जातात. किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्यास त्यांच्या माध्यमातून पसरणाऱ्या काही विषाणूजन्य रोगांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचे थेट नियंत्रण चिकट सापळ्यांद्वारे होत नाही. त्यासाठी पिकानुसार शिफारशीत रोग व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.