नागपूर १४ : नागपूर शहर पोलीस दलातर्फे “ऑपरेशन शोध” ही विशेष मोहीम सध्या प्रभावीपणे राबवली जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हरवलेल्या बालकांचा व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या किंवा कुटुंबीयांच्या ताब्यात देणे. या कार्यामध्ये पोलीस दला बरोबरच नागरीकांचे सजग सहकार्य हे अत्यंत मोलाचे ठरत आहे.
अशाच एका घटनेत, पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत लाडीकर ले-आउट, मानेवाडा रोड येथील रहिवासी अनिल पांडे (वय ४२ वर्षे) यांनी आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. ही घटना पांडे कुटुंबासाठी मोठा मानसिक आघात होती.
शोध मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, नागभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील रहिवासी अनुज विजय सोनी (वय २८ वर्षे) यांनी एक जागरूक, जबाबदार आणि सहृदय नागरीक म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी सदर हरवलेली अल्पवयीन मुलगी नागभवन परिसरात दिसल्याची महत्वाची माहिती पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे तातडीने आणि अचूकपणे पोहोचवली.
अनुज सोनी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत सदर मुलीचा शोध घेतला आणि तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्त केले. त्यांच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला दिलासा मिळाला आणि चिंतेने भरलेल्या वातावरणात आश्वासक प्रकाश पडला.
नागपूर शहर पोलीस दलामार्फत अनुज विजय सोनी यांच्या सामाजिक बांधिलकीची, माणुसकीची व संवेदनशीलतेची मनापासून दखल घेऊन त्यांचा सन्मान मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल नागपूर शहर यांनी त्यांच्या कार्यालयात बोलवून त्यांचा प्रत्यक्ष प्रशंसापत्र देऊन गौरव केला.
“ऑपरेशन शोध” ही मोहीम केवळ पोलिसांची नाही, तर प्रत्येक सुजाण नागरीकाची आहे. आपल्या समाजातील अशा जबाबदार तरुणांच्या सहकार्यामुळेच नागपूर शहर अधिक सुरक्षित, सशक्त व विश्वासार्ह बनत आहे.




