spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वरठी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज भंडारा वरठी :- वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून रोकड व मुद्देमाल लांबवणाऱ्या सराईत घरफोड्याला अटक करण्यात वरठी पोलिसांना अवघ्या काही दिवसांत यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि चोरीचा मुद्देमाल असा एकूण ३ लाख २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या टोळीतील अन्य एका आरोपीचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी ६२,६५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी वरठी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा (अ.क्र. ३६३/२०२६) दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

तांत्रिक विश्लेषण अन् गुप्त माहिती ठरली मोलाची पोलीस अधीक्षक नूरुल हसन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अविनाश विजय राघोर्ते (वय २९ वर्षे, रा. अर्जुनी पुनर्वसन, ता. जि. भंडारा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्याचा आणखी एक साथीदार सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

महिंद्रा झायलो कारसह मुद्देमाल हस्तगत आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २५,७००/- रुपये किमतीचे चोरीचे साहित्य आणि या गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा झायलो कार (किंमत अंदाजे ३,००,०००/- रुपये) असा एकूण ३,२५,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली यशस्वी कारवाई सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. जगताप, स.फौ. भोंगडे, पो.हवा. मारबते, पो.हवा. बुरडे व वरठी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, सराईत गुन्हेगार जेरबंद झाल्याने घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.