– ‘वंदे मातरम्’च्या मानवी साखळीतून देशभक्तीचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पीएम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेत विविध जनजागृतीपर व मूल्याधिष्ठित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आभार’ आणि ‘संकल्पनेची’ आकर्षक रांगोळी साकारली. तसेच विद्यार्थ्यांनी एकत्रित येत ‘वंदे मातरम्’ या शब्दांची मानवी साखळी तयार करून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागाचा संदेश दिला.
या उपक्रमास महापौर संगीता राजेंद्र खांडेकर, उपमहापौर प्रशांत आनंद्राव दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी संदीप गिऱ्हे, आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त शेषराव टाले, शिक्षणाधिकारी सुनील आत्राम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी कुंडले यांची उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळीचे तसेच ‘वंदे मातरम्’च्या मानवी साखळीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेली देशभक्ती, कृतज्ञता व सामाजिक जाणीव ही अभियानाच्या उद्दिष्टांना अधोरेखित करणारी ठरली.
‘सेवा संकल्प अभियान’ाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, कृतज्ञता, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानासोबतच सामाजिक व राष्ट्रीय मूल्यांची जाणीव होण्यास मदत होत आहे.
पीएम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून ‘सेवा, संकल्प आणि राष्ट्रभक्ती’ या मूल्यांचा संदेश प्रभावीपणे दिला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्जनशीलतेमुळे हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.
— चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर





