spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पश्चिम बंगालमधील विजय हा देशातील प्रत्येक राष्ट्रवादी नागरिकाचा

– भाजपा प्रदेश कार्यालयातील विजयोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेला निर्विवाद विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही तर हा देशातील प्रत्येक राष्ट्रवादी नागरिकाचा विजय आहे. भारताच्या एकतेला, अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या घुसखोरांच्या विरोधातील हा विजय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. हा विजय ममता बॅनर्जीच्या काळात प्राण गमावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असे फडणवीस म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथे मिळालेल्या यशाबद्दल भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रदेश कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा केला. यावेळी फडणवीस बोलत होते. ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते.

आधी 30 वर्षे काँग्रेस, त्यानंतर 24 वर्षे कम्युनिस्ट आणि त्यानंतर 15 वर्षे तृणमूल कॉंग्रेसने राज्य करून पश्चिम बंगालची अशी अवस्था केली की येथे अर्धा टक्काही थेट विदेशी गुंतवणूक येत नाही. या राज्यातून सहा हजार उद्योगधंदे बाहेर निघून गेले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले. तेथे हजारो कोटींची गुंतवणूक केली, महामार्ग, मेट्रो नेली. त्यामुळे येथे सकारात्मक परिवर्तन कोण करेल तर ते नरेंद्र मोदी अशी मतदारांची खात्री पटल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पक्षाचे चाणाक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाची नव्याने सूत्रे हाती घेतलेले नितीन नबिन तसेच सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी भारतात होणारी घुसखोरी, दहशत आणि हल्ले यांच्याविरोधात सातत्त्याने लढा देत विजयश्री खेचून आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. जेव्हापासून आसाममध्ये भाजपा आहे तेव्हापासून तेथील घुसखोरीला आळा बसला असून आता आसाम राज्य भारताच्या वाटचालीचे इंजिन झाल्याने मुख्यमंत्री म्हणाले.

हा अभूतपूर्व विजय म्हणजे मोदीचा करिष्मा आहे. हा विजयाचा महोत्सव नाही तर राष्ट्रावादासोबत असलेला प्रत्येक माणूस जिंकला आहे. या विजयाने देशाच्या 78 टक्के भूभागावर भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे राज्य झाले आहे. आता ममता दिदी या तेथील ईव्हीएमविरोधात बोलतील. मात्र केरळमधील ईव्हीएमबद्दल बोलणार नाहीत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की भाजपाला विचारधारा आणि राष्ट्रीयत्व देणाऱ्या नेत्यांचा पश्चिम बंगालमधील मतदारांनी केलेला हा सन्मान आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दहा हजार कार्यकर्ते बंगालमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रात्रीचा दिवस एक केला. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही परिश्रम घेत हा विजय खेचून आणला.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी घेतला झालमुरीचा आस्वाद

पश्चिम बंगालमधील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुरी या स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे हा खाद्यपदार्थ मोठा लोकप्रिय झाला होता. पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात झालमुरी विक्रेत्याला पाचारण करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.