– आरोपी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असल्याच्या वृत्ताची पोलिसांनी तातडीने सत्यता पडताळावी; दोषींना कोणतेही राजकीय संरक्षण मिळू नये — ॲड. धर्मपाल मेश्राम
नागपूर :- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणात संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्यासह संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विश्वजित कोवासे हे फरार असल्याचे सांगितले जात असताना ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर फरार आरोपीला आश्रय किंवा संरक्षण दिल्याची भूमिका आढळून आल्यास विजय वडेट्टीवार यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
ॲड. मेश्राम म्हणाले की, “जपतलाई आश्रमशाळेतील तीन आदिवासी मुलींच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. फरार असल्याचे सांगितले जाणारे व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असल्याचा दावा समोर येत असेल, तर पोलिस प्रशासनाने त्याची तातडीने सत्यता पडताळावी.”
“एखाद्या व्यक्तीने आरोपीला जाणीवपूर्वक आश्रय किंवा संरक्षण दिले असल्याचे तपासातून आणि पुराव्यांतून स्पष्ट झाले, तर त्या व्यक्तीची राजकीय ओळख किंवा पद लक्षात न घेता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांचा आरोपीला आश्रय किंवा संरक्षण देण्यात कोणताही सहभाग असल्याचे ठोस पुरावे तपासात आढळल्यास, त्यांच्याविरुद्धही कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी,” असे ॲड. मेश्राम यांनी म्हटले.
तीन निष्पाप आदिवासी विद्यार्थिनींच्या मृत्यूमागील सर्व कारणांची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि तपास कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय पारदर्शकपणे पूर्ण करावा, अशी मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.
– ॲड. धर्मपाल मेश्राम,माजी उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश





