पालघर २८ : विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सतत वाढत असून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील विरारमधील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत मंगळवारी (26 ऑगस्ट) मध्यरात्री कोसळली आणि या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच विरारमध्ये मात्र मृतदेह बाहेर काढण्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळत आहेत. या अपघातानंतर लगेचच एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून ढिगाऱ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. इमारत अरुंद गल्लीत असल्याने मोठ्या वाहनांना घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले, त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना हाताने ढिगारा उपसून बचावकार्य करावे लागत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ खर्च झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारत अवघी 15 वर्षे जुनी असूनही तिचा मागील भाग रात्री 12.05 वाजता कोसळल्याने अनेक कुटुंबांवर काळाने घाला घातला. वसई विरार महानगरपालिकेने (VVMC) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला अटक केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. आतापर्यंत सात मृतांची ओळख पटली असून त्यामध्ये आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (26), दिनेश प्रकाश सपकाळ (43), सुप्रिया निवलकर (38), अर्णब निवलकर (11) आणि पार्वती सपकाळ यांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ एकत्रितपणे मदतकार्य करत असले तरी ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असल्याचा अंदाज असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




