महापालिका निवडणुकांच्या रणमैदानात तुंबळ लढाई चालू असून विविध राजकीय पक्षांनी आपापले वचननामे, जाहीरनामे, संकल्पपत्रे जाहीर केली आहेत. सत्ता मिळाल्यास यंव करु, त्यंव करु असा ‘यंवत्यंवनामा’ अनेक नेत्यांनी घोषित केल्यामुळे काही मतदारांनाही इसाळ आला. आम्हीही त्यापैकी एक. अशा इसाळग्रस्त मतदारांनी उमेदवारांसाठी आपला अपेक्षानामा का जाहीर करू नये असे वाटल्याने येथे त्याचाच एक मसुदा देत आहो. औंदा आम्हालाही अपेक्षानामा जाहीर करायला थोडका उशीर झाला. अर्थात आधीच हा अपेक्षानामा जाहीर केला असता तर राजकीय नेत्यांनी ‘होऽऽ…करतो की!’ असे जाहीर आश्वासन देऊन आमचेच दात आमच्या घशात घातले असते, हे खरेच. उशीर तर उशीर! आम्ही अपेक्षानामा येथे ठेवत आहो. यात आपापल्या मगदुरानुसार इसाळग्रस्तांनी भर घालावी, अशी आमची पहिली नम्र अपेक्षा आहे.
– ठिकठिकाणाहून मतदारांना पैसे वाटल्याच्या बातम्या, व्हिडिओ क्लिपा येत आहेत. हे पैसे वाटणारे दानशूर उमेदवार आमच्या दारावर का बरे येत नाहीत? हे दु:ख आम्ही नेहमी गिळत आलो. पैसा दुसऱ्याला, आणि आम्हाला मात्र फक्त कोरडा नमस्कार असे का? ही लोकशाही नव्हे! हे कलम बदलले पाहिजे.
– यापुढे हरेक मतदारास प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने अधिकृतरीत्या ठराविक रक्कम द्यावी. आम्ही घराच्या दारावरच क्यूआर कोड चिकटवू. फक्त ऑनलाइन पेमेंटच स्वीकारले जाईल, याची नोंद घ्यावी.
– रविवारी दुपारी जेवायला बसणार इतक्यात उमेदवार डोअर टु डोअर क्यांपेन करत आला. पाठोपाठ दुसरा उमेदवार आला. मग तिसरा, चौथा…अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास मुखात पहिला घास गेला. यापुढे दुपारी १ ते ४ याकाळात प्रचारास बंदी करावी.
– उमेदवाराने आपण काल कुठल्या पक्षात होतो, आज कुठे आहोत, आणि उद्या कोणाकडे जाणार आहोत, याची आगाऊ सूचना देणे अनिवार्य आहे. आम्ही काँग्रेसला मत देऊ केले, तर तो उमेदवार ते घेऊन कमळाकडे गेला!!
– एक दानशूर उमेदवार मतांच्या बदल्यात आम्हाला कुकर देऊन गेला आहे. मतदानानंतर खात्री पटल्यानंतरच कुकरचे झाकण मिळेल, असे सांगून गेला आहे! सदरील उमेदवाराने बिनझाकणाचा कुकर घेऊन जावा, ही विनंती आहे.
– सर्व राजकीय पक्षांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपापले वचननामे निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ४८ तासात प्रसिध्द करावेत. तसेच त्याच काळात साहित्य संमेलने वगैरे असतील तर पुस्तक प्रदर्शनात प्रती उपलब्ध करून द्याव्यात. विनोदी साहित्य म्हणून या प्रतींवर वाचकांच्या उड्या पडतील, याची खात्री आहे. वाचन संस्कृती रुजवण्याचा हा एक हमखास मार्ग आहे.
– वचननाम्यात लंब्यालंब्या फेकण्याची शर्यत लागते. ज्या वचननाम्यांमध्ये सर्वाधिक कल्पक पतंगबाजी असेल, त्यास पुरस्कार देण्यात यावा. शेवटी वचननामे लिहिण्यासाठीही प्रतिभेचे वरदान लागते, हे आता रसिकांना पटले आहे.
– वचननामे वाचून कुणी मतदानाला जाते असे नाही. तरीही ते प्रसिद्ध केले जातात. या वचननाम्यातील वचनांवर कुणाचा विश्वास बसतो, असेही नाही. तरीही ती वचने दिली जातात. गेल्या असंख्य वर्षात अनेक वचननामे आले आणि गेले. त्यातली किती वचने पाळली गेली, हे कोणीही पाहात नाही. यापुढे आम्ही मतदार ते पाहणार आहोत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
– फेकाफेक असूनही सदरील चोपड्याला वचननामा असेच म्हटले जाते. हे बदलावे लागेल. यापुढे निवडणूक जाहीरनाम्यांना ‘यंवत्यंवनामा’, ‘पतंगनामा’, अशीच नावे दिली जावीत.
– हा अपेक्षानामा आम्ही १४ कोटी मराठी जनतेसाठी फुकट उपलब्ध करुन देणार आहोत.




