spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने काढल्याजाताय अंबाझरीतील ‘जलपर्णी’

– जलपर्णी काढण्याच्या कार्याची महापौर, स्थायी समिती सभापती व आयुक्तांकडून संयुक्त पाहणी

नागपूर :- अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णीचा विळखा समूळ नष्ट करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यापासून तलावात अत्याधुनिक ‘हार्वेस्टर’ यंत्रांच्या साहाय्याने काम सुरू करण्यात आले असून, या कामाची संयुक्त पाहणी महापौर निता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक योगेश पाचपोर, मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी उपस्थित होते.

तलावातील जलपर्णी वेगाने काढण्यासाठी या दोन्ही अत्याधुनिक मशिन्ससोबतच ५ पोकलँड, २ जेसीबी आणि काही टिप्परचीही मदत घेतली जात आहे. या नव्या यंत्रसामग्रीमुळे अंबाझरी तलाव जलपर्णीमुक्त करण्याच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. ‘हार्वेस्टर’ यंत्र ही मोठ्या तलावांमधील जलपर्णी, अतिरिक्त जलवनस्पती आणि उपद्रवी वनस्पतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने काम करते. ही अत्याधुनिक यंत्रे पाण्याखालील, आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या व्यवस्थापनात अतिशय कार्यक्षम आहेत.

‘प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना’ आणि ‘जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नागपूर’ अंतर्गत पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रण उपाययोजना निधीतून या मशीनची खरेदी करण्यात आली आहे. हे यंत्र एकाच वेळी साडेचार ते पाच टन जलपर्णी काढू शकते. दिवसाकाठी किमान एक ते दोन एकर परिसरातील जलपर्णी साफ करण्याची या यंत्राची क्षमता आहे. या अत्याधुनिक यंत्रामुळे अंबाझरी तलावाचे नैसर्गिक सौंदर्य परत मिळण्यास आणि तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून दूर करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.