– अधिकाधिक महिलांना प्रशिक्षण देण्याचे आयुक्तांचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे संचालित पुनापूर पारडी येथील कौशल्य विकास केंद्राला मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी गुरुवारी (ता. 21) भेट दिली. यावेळी आयुक्तांनी दीनदयाल अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून मनपाचा समाज विकास विभाग, आरोह मल्टीपरपज सोसायटी आणि डब्ल्यूसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहायता समूहातील महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती प्रकल्प, जलपर्णी वनस्पतीपासून इको-फ्रेंडली अशा विविध गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणारे हस्तशिल्प केंद्र आणि टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून युवकांसाठी चालविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली.
याप्रसंगी प्र अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता अजय पाझारे, समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार, नूतन मोरे, आरोह संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी, अजय बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक स्वाती धोटकर, असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कपिल चंद्रयान, तसेच विजय शर्मा, आशिष काळे, टाटा स्ट्राईव्हचे मोहित देशपांडे, योगेश खिराळे देवदत्त पात्रे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.![]()
यावेळी आरोह मल्टीपरपज सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी यांनी प्रशिक्षण केंद्रांतर्गत आतापर्यंत ३६ स्वयंसहायता समूहातील महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना स्वयंरोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना घरूनच काम करता येते का, याबाबत आयुक्तांनी माहिती घेतली. प्रशिक्षण केंद्रातून तयार होणाऱ्या उत्पादनांना योग्य मार्केट मिळवून देण्यासाठी बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रयत्न करण्यात यावेत, तसेच गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट्स तयार केले जावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर आयुक्तांनी जलपर्णीपासून हस्तशिल्प व रोजगार निर्मिती प्रकल्पाला भेट दिली व या प्रकल्पाच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. जलपर्णीपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी लूम मशीनद्वारे ५० महिलांना आणि रोलर मशीनद्वारे ५० महिलांना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील अजय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. पुढे त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती अजय बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक स्वाती धोटकर यांनी दिली. महिलांसाठी रोजगार निर्मितीचे आवश्यक प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या, तसेच त्यांनी जलपर्णीपासून तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणीही केली.
त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून फ्रंट ऑफिस असोसिएट, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, फील्ड टेक्निशियन, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस कोर्स, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, जनरल ड्युटी असिस्टंट, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स, आणि टू-व्हीलर सर्व्हिस टेक्निशियनबाबत युवकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. या प्रशिक्षणात विधवा व परित्यक्ता अशा गरजू महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.![]()
पारडी येथील भाजीपाला बाजार आणि मटण मार्केटची आयुक्तांनी केली पाहणी
पारडी येथील प्रस्तावित भाजीपाला बाजार, मटण मार्केट आणि डीपी रोडची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी आज (ता.21) पाहणी केली. यावेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता अजय पाझारे, उपअभियंता राजीव गौतम, मंगेश गेडाम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पारडी येथे 40 कोटी निधीच्या माध्यमातून मनपातर्फे भाजीपाला बाजार, मटण मार्केट तयार करण्यात येणार आहे. यावेळी मनपा आयुक्त यांनी पारडीतील भाजीपाला बाजार आणि मटण मार्केट आणि प्रस्तावित डीपी रोडची पाहणी करीत झुडपी जंगलच्या जागे संदर्भात मनपा, महसूल आणि वन विभागाची बैठक लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.