spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्रावण महिना कधी सुरू होतो? श्रावणी सोमवार किती आहेत? ‘शिवामूठ’ म्हणजे काय? महत्त्व, पूजा आणि कथा जाणून घ्या

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. भक्ती, श्रद्धा आणि संयम यांचा संगम असलेल्या या पवित्र महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. श्रावणी सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व आहे आणि अनेक भक्त या दिवशी उपवास, अभिषेक आणि पूजन करून भगवान शंकराची कृपा मिळवतात.

यंदा श्रावण महिना कधीपासून?

श्रावण 2025 यंदा 25 जुलैपासून सुरू होऊन 23 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या कालावधीत चार श्रावणी सोमवार असणार आहेत.

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ वाहण्याचे महत्त्व

श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर विशिष्ट धान्य अर्पण केले जाते, यालाच शिवामूठ असे म्हणतात. या प्रथेचा धार्मिक दृष्टिकोनातून फार मोठा महत्त्व आहे. श्रद्धेने शिवामूठ वाहिल्यास जीवनातील अडचणी दूर होतात, सुख-समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे.

श्रावणी सोमवार आणि संबंधित शिवामूठ:

  • 28 जुलैतांदूळ

  • 4 ऑगस्टतीळ

  • 11 ऑगस्टमूग

  • 18 ऑगस्टजव

शिवामूठ म्हणजे काय?

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठ विशिष्ट धान्य अर्पण केले जाते. याला शिवामूठ असे म्हणतात. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची अर्पणा होते. हे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.

शिवामूठ कशी अर्पण करावी?

  • सर्वप्रथम दिवा लावा.

  • महादेवाला हळद-कुंकू न अर्पण करता भस्म किंवा लाल चंदन लावा.

  • बेलपत्र, धोतऱ्याचे फळ, रुई, शमी यांसारख्या प्रिय वस्तू अर्पण करा.

  • उजव्या हातात धान्य घेऊन त्यावर पाणी शिंपडा व तीन वेळा शिवामूठ अर्पण करा.

  • पूजनानंतर आरती व स्तोत्र पठण करा.

शिवामूठची कथा

एक नावडती सून, जी गुरांच्या गोठ्यात राहत होती, तिचे जीवन बदलवणारी शिवामूठ व्रत कथा फार प्रसिद्ध आहे. देवकन्या व नागकन्येच्या सांगण्यावरून तिने श्रावणातील सोमवारी श्रद्धेने उपवास करून शिवामूठ वाहिली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला सोन्याच्या देवळात दर्शन दिले आणि तिच्या जीवनात सुख-समृद्धी आणली. ही कथा भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचे उदाहरण आहे.

श्रावण म्हणजे सेवा, दान आणि साधनेचा काळ

श्रावण महिना केवळ उपवास, रुद्राभिषेक किंवा शिवपूजनापुरता मर्यादित नाही. या काळात केलेले दानधर्म, सेवा आणि सकारात्मक विचार जीवनात चांगले परिवर्तन घडवून आणतात.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.