spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पूल कोसळल्यास जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार?

– मधोमध वाकलेला ‘ तो ‘ जिर्ण पुल देतोय अपघातास निमंत्रण 

– जड वाहनांची वाहतुक बंद, लांब अंतराचा फेरा

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- पेंच जलाशयाच्या मुख्य डाव्या कालव्यावरील तथा पाटबंधारे विभागातंर्गत येणाऱ्या रामटेक -चिचाळा मार्गावर असलेला जिर्ण पूल देखभाल व दुरुस्तीअभावी सध्या स्थितीमध्ये मधोमध वाकला असून तो जीवितहानीचा सापळा ठरत आहे. संभाव्य धोका ओळखुन पाटबंधारे विभागाने दुचाकी वगळता चार चाकी व जड वाहनांची वाहतुक या पुलावरून बंद केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजुला बॅरिकेट्स लावुन बॅरिकेट्स कुणी बाजुला करू नये यासाठी त्या बॅरिकेट्स ला खालुन माती टाकुन त्यामध्ये फिट केल्या गेले आहे. जवळपास गेल्या तिन महिन्यांपासून अशी परिस्थिती असुन अद्यापही या पुलाच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली नसुन शासन व प्रशासन जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किती उदासिन आहे हेच आता या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या तिन महिन्यांपुर्वी पुल वाकल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. ती स्थानिक पाटबंधारे विभागाच्या कर्णपटलापर्यंत पोहोचताच संभाव्य धोका ओळखून स्थानिक पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या (दि.१३) सप्टेंबर २०२५ च्या दुपारपासून या पुलावरील जड व चारचाकी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुचाकी वाहतूक अद्यापही सुरूच असल्याने प्रशासनाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा पूल कोसळल्यास जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रामटेक-चिचाळा हा मार्ग पुढे काचूरवाहीसह तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा कमी अंतराचा व सोयीचा मार्ग असल्याने येथे रहदारीचे प्रमाण मोठे आहे. या जिर्ण व वाकलेल्या पुलाचा अपवाद सोडला तर रामटेक-काचुरवाही रस्ता हा गुळगुळीत डांबरीकरणाचा रस्ता आहे. मार्ग बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सोबतच हा कालवा जागोजागी उखडला असुन तो फुटण्याची व शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याचीही दाट शक्यता आहे. कालव्याच्या डागडुजीला तथा पुलाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही.

तब्बल १७३० कोटीचे अंदाजपत्रक शासनास सादर 

याबाबद स्थानिक पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांना विचारणा केली असता त्यांनी ‘ सदर पुलाच्या डिझाईन साठी चे काम सुरू आहे. लवकरच डिझाईन इस्टीमेट होऊन काम सुरू होईल. संपूर्ण पेंच कालवा प्रणाली पूनर्जीवित करण्याकरिता तब्बल १७३० कोटीचे अंदाजपत्रक एसएलटीसी कडून शासनास सादर होत आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल व लवकरच पेंच प्रकल्प आपली कात टाकून भरारी घेईल ‘ असे त्यांनी माहिती देतांना सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.