लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भारत अमेरिकेचा गुलाम होत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अध्यक्षांकडून विरोधी लोकप्रतिनिधींना बोलू दिले जात नाही आणि संसदीय परंपरांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करत इंडिया आघाडीने केला आहे. सत्ताधारी भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावत विरोधक जाणीवपूर्वक गोंधळ घालत असल्याचे म्हटले आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाचा सातत्याने अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून अपमान होत आहे. त्यावर मोदी काहीही बोलायला नाहीत. यावर आम्ही चर्चा करण्यासाठी संसदेत वेळ मागितला होता. त्यावर संसदेचे अध्यक्ष यावर विरोधकांना बोलू देत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. या देशाच्या संसदेत गेल्या १० वर्षांपासून भारतीय घटनेचा संसदीय लोकशाहीचा गळा ज्या पद्धतीने घोटला जातोय, त्याच्या विरुद्धचा एक उद्रेक विरोधी पक्षांचा आहे. विरोधी पक्षनेत्यांना, विरोधी नेत्यांना बोलू द्यायचं नाही. त्यांना सातत्याने अपमानित करायचं. नियमाने संसद चालवायची नाही. अनेक राष्ट्रीय हिताचे आणि सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा घडू द्यायची नाही. हे गेल्या काही काळापासून संसदेच्या सभागृहात सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले.
अशावेळेला सरकार पक्षाने विरोध पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन त्यांना काढणं सहज शक्य होते, पण आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे यात आम्ही विरोधी पक्षाचा आवाज सभागृहात पोहोचू देणार नाही, त्यावर शेवटी एक उपाय आणि हत्यार म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील ठराव विरोधी पक्षांनी आणलेला आहे. याला इंडिया आघाडीचे समर्थन आहे. यात असलेला प्रत्येक व्यक्ती या ठरावाच्या बाजूने आहे. त्यावर आता चर्चा होईल, असेही संजय राऊतांनी सांगितले.
अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून देशाचा अपमान
जागतिक पातळीवर भारताची जागा आता काहीच नाही. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारुन करावी लागत आहे. १९४७ पर्यंत देश ब्रिटीशांचा गुलाम होता, त्या गुलामगिरीविरोधात आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला. आताच्या राज्यकर्त्यांचे पूर्वज त्यात नव्हते. अलीकडच्या काळात भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. देशाच्या पंतप्रधानांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान झाला यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मत व्यक्त करण्यासाठी आणि भाषण करायला वेळ आहे, पण या देशाचा सातत्याने अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून अपमान होत आहे. त्यावर मोदी काहीही बोलायला नाहीत. यावर आम्ही चर्चा करण्यासाठी संसदेत वेळ मागितला होता. त्यावर संसदेचे अध्यक्ष यावर विरोधकांना बोलू देत नाही. हे देखील एक हुकूमशाही आणि अप्रत्यक्ष गुलामगिरी आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.