spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाईल्ड अजाईल फाऊंडेशनतर्फे ‘जीवनधारा’ उपक्रमाला सुरुवात

– शाळांकडून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आज आपल्याकडे स्वच्छ हवा, पाणी, वृक्ष आणि जैवविविधतेचा अनमोल खजिना आहे. पण आपण आज जर याचे रक्षण आणि संवर्धन केले नाही, तर कदाचित येणाऱ्या पिढ्या या सर्व सौंदर्यापासून वंचित राहतील. याच जाणिवेवर आधारित वाईल्ड अजाईल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘जीवनधारा’ हा प्रेरणादायी उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे असा आहे.

वन्यजीव सप्ताह २०२५ दरम्यान नागपूरमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांमध्ये ‘जीवनधारा’ उपक्रम राबवण्यात आला. जीवनधाराच्या माध्यमातून २१ शाळांमधील २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचविण्यात आला.

वन्यजीव जागरूकता आणि शैक्षणिकदृष्ट्या तयार करण्यात आलेला माहितीपट विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमातील मुख्य आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांना हा माहितीपट दाखवून निसर्गसंवर्धन, स्थानिक जैवविविधता आणि सहअस्तित्वाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी दीप्ती पंडे आणि स्मृती चोबितकर यांनी केले. तर वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचे संस्थापक प्रफुल देशमुख तसेच पराग चोबितकर आणि सारंग अनारसे यांच्या सहकार्याने संपूर्ण टीमने हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.

याबाबत बोलताना प्रफुल देशमुख म्हणाले, ‘जीवनधारा’ हा केवळ एक उपक्रम नाही, तर ही चळवळ आहे. वन्यजीव सप्ताहापासून या उपक्रमाची केवळ सुरुवात करण्यात आली. आम्ही हा प्रवास वर्षभर सुरू ठेवणार आहोत. जोपर्यंत प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थी या मिशनशी जोडला जात नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. निसर्गाशी सहअस्तित्वाची जाणीव निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढील पिढीला सक्षम बनवणे, हा वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचा स्पष्ट उद्देश आहे.

दरम्यान, शाळांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक शाळांनी अशा प्रकारचे शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.