spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

– वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार

मुंबई :- कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन ई-चलन प्रणाली, वेगमर्यादा नियम, एएनपीआर कॅमेरे तसेच दंड आकारणी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड, सदस्य मनोज चौगुले, महेंद्र काळभोर, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, गौरव कुसाळे, रफिक रावथर, अशोक कुचकोरवी, राजु ढाले, सुनील मगदुम आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात जुन्या ई-चलनांची सरसकट रद्दबातल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादेचा पुनर्विचार, एएनपीआर कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, वाहनांमधील अंतराच्या नियमांमध्ये व्यवहार्य बदल तसेच दंडावरील चक्रवाढ पद्धत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहतूक व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वाहतूकदारांच्या अडचणी शासन गंभीरपणे ऐकत असून, नियमांची अंमलबजावणी करताना अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ई-चलन आणि वेगमर्यादा संदर्भातील तक्रारींबाबत संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागवून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच, रस्ते सुरक्षा अबाधित ठेवत वाहतूकदारांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.