– ‘महापौर श्रावण उत्सव’ रंगला आनंदात
नागपूर :- श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिलांना दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून विरंगुळ्याचे क्षण मिळावेत, त्यांना आपल्या मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने आनंद लुटता यावा आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘महापौर श्रावण उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला. धनसंस लॉन, वर्धमान नगर चौक येथे (ता.०१) पार पडलेल्या या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्यास मनपा महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, श्रावण उत्सवासाठी सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात महापौर निता ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या प्रेरणेतून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच दैनंदिन आयुष्यात चार क्षण सुखाचे अनुभवता यावे व त्याचा आनंद लुटता यावा याकरीत श्रावण उत्सव आयोजित करण्याचे करता आल्याचे समाधान व्यक्त केले.
महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. श्रावण महिन्याचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा, गीत-संगीत आणि विविध स्पर्धांमुळे संपूर्ण वातावरण उत्सवी झाले. 

श्रावण हा केवळ धार्मिक विधी आणि उपवासाचा महिना नसून, भारतीय संस्कृतीतील उत्सवप्रियता आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा काळ आहे. कुटुंब, मुलं आणि नोकरी-व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लड्ढा, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, लकडगंज झोन सभापती माहेश्वरी बिसेन, नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे, माजी उपमहापौर मनीषा कोठे, माजी उपमहापौर मनीषा धावडे, नगरसेविका शीतल लालोरकर, नगरसेविका चेतना निमजे, नगरसेविका रंजनी वाघमारे, नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेविका अर्चना पडोळे, नगरसेविका शारदा बारई, माजी नगरसेविका वैशाली रोहणकर, माजी नगरसेविका कांता रारोकर, संध्या कृष्णा खोपडे, तसेच क्रीडा विभागाच्या उज्ज्वला चरडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महिलांसाठी आनंदाचे व्यासपीठ
आमदार कृष्णा खोपडे यांनी महिलांनी या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन केले. महिलांसाठी नागपूर शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला शक्ती, महिला जागरूकता, महिला सशक्तीकरणाचा हा कार्यक्रम असल्याचे ते बोलले. तसेच त्यांनी आयोजनकांबद्दल सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करीत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापासून सण-उत्सवांची मालिका सुरू होते. या पार्श्वभूमीवर महिलांसाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि आनंददायी आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमधून महिलांना उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळतो, असे त्यांनी नमूद केले. तर आयोजनासाठी सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा, नृत्य आणि संगीताने वाढवली रंगत
कार्यक्रमातील विविध स्पर्धांनी महिलांचा उत्साह द्विगुणित केला. ‘श्रावण क्वीन’, ‘फुल राणी’, ‘तुझी माझी जोडी’ आणि ‘रंग माझा हिरवा’ या स्पर्धांना महिलांचा विशेष प्रतिसाद मिळाला. याशिवाय श्रावण गीतांचे सादरीकरण, नृत्य, विविध खेळ, फॅशन शो आणि मनोरंजनपर उपक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्सवी रंगत आली. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. जिंकलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.



