पांढरकवडा :- पांढरकवडा व परिसरातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘गावठी स्वाद महिला उद्योग समूहा’च्या माध्यमातून गृहउद्योग सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात भाकरी केंद्राने करण्यात आली असून, महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अल्काजेन या कंपनीच्या आर्थिक सहकार्याने व NEED संस्थेच्या मदतीने भाकरी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन एका दिव्यांग तरुणीच्या हस्ते करण्यात आले. ही तरुणी पांढरकवडा शहरातील चौकात शिंगाडे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमाला सामाजिक संदेशाची किनार लाभली. तालुका ठिकाणासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार, पौष्टिक व स्वच्छ घरगुती अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दहा महिलांनी एकत्र येऊन हा उद्योग समूह सुरू केला आहे. सध्या भाकरीची विक्री सुरू असून, येत्या काळात विविध प्रकारची लोणची, चटण्या, पुरणपोळी तसेच संक्रांत पर्वासाठी तिळगुळाचे लाडू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा गृहउद्योग ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणास हातभार लावणारा असून, इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
पांढरकवड्यात महिलांचा गृहउद्योग सुरू ‘गावठी स्वाद महिला उद्योग समूहा’कडून भाकरी केंद्राची सुरुवात









