– पोलिस तक्रारीचा दिला दाखला; वैभव चोपकर व चंद्रशेखर सेलोकर यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
हंसराज,भंडारा तुमसर :- कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथील हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाने कामगारांविरुद्धच पोलिसांत धाव घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासनाच्या या ‘दडपशाही’ धोरणाचा निषेध म्हणून हमाल माथाडी कामगार कृती समितीने १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीवर जाहीर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात समितीचे समन्वयक वैभव चोपकर व सहसमन्वयक चंद्रशेखर सेलोकर यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला असून, कामगारांच्या हक्कासाठी आता कायदेशीर लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बाजार समितीमधील हमाल, मापारी आणि टोपलेवाले कामगारांच्या विविध रास्त मागण्यांसाठी कृती समितीने गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. यावर सकारात्मक चर्चा होऊन कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, बाजार समिती प्रशासनाने कामगारांच्या निवेदनांना चक्क ‘गुन्हेगारी’ स्वरूप देत कामगार प्रतिनिधींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बाजार समितीने १० एप्रिल रोजी पत्र निर्गमित करून १७ एप्रिल (शुक्रवार) रोजी सकाळी ११ वाजता संयुक्त सभेचे आयोजन केले होते. मात्र, “एका बाजूला चर्चेचे निमंत्रण द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला कामगार प्रतिनिधींवर पोलीस कारवाईची मागणी करायची, हा प्रशासनाचा दुटप्पी चेहरा आहे,” अशी टीका कृती समितीने केली आहे. जोपर्यंत कामगारांविरुद्धची पोलीस तक्रार मागे घेतली जात नाही आणि कामगारांना आदराची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत अशा कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे वैभव चोपकर यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, कृती समितीने आपल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी (भंडारा), उपनिबंधक (सहकारी संस्था) आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवली आहे. प्रशासनाने आपली आडमुठी भूमिका न बदलल्यास आगामी काळात बाजार समितीच्या कामकाजावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“प्रशासनाने चर्चेचे नाटक करण्यापेक्षा कामगारांच्या समस्या गांभीर्याने सोडवाव्यात. कामगारांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा वापर करणे हा लोकशाही हक्कांवर घाला आहे. १७ तारखेच्या बैठकीत कामगारांच्या हिताविरुद्ध कोणताही एकतर्फी निर्णय घेतला गेला, तर जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांकडे धाव घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— वैभव चोपकर, समन्वयक, हमाल माथाडी कामगार कृती समिती, भंडारा.



