हंसराज,भंडारा लाखनी :- धान्य खरेदी मर्यादेत वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी १३ एप्रिल २०२६ पासून आमरण उपोषणाला बसलेले ‘शिवाजी महाराज शेतकरी-शेतमजूर संघटनेचे’ अध्यक्ष मनोज पटले (रा. परसोडी) यांनी अखेर प्रशासकीय आणि राजकीय आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. आमदार परिणय फुके यांनी या प्रश्नी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर, तहसीलदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ पाणी देऊन हे उपोषण सोडवण्यात आले.
मनोज पटले यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १३ एप्रिलपासून लढा पुकारला होता. धान्य खरेदीची मर्यादा वाढवणे हा या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू होता. या आंदोलनाची दखल घेत आमदार परिणय फुके यांनी हा प्रश्न जिल्हा आणि राज्य शासन दरबारी मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाणे, किसान आघाडीचे अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर आणि तहसीलदार शितल धावते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पटले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नारळ पाणी देऊन पटले यांनी उपोषणाची सांगता केली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, किसान आघाडी अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीकांत भुसारी, तहसीलदार शितल धावते, माजी उपसभापती गिरीश बावनकुळे, लाखनी ग्रामीण तालुका अध्यक्ष घनश्याम मते, तालुका अध्यक्ष भुमेश ढेंगे, शहर अध्यक्ष महेश आकरे, लाखनी नगरसेवक संदीप भांडारकर, माजी तालुका अध्यक्ष श्रावण कापगते, पुरवठा निरीक्षक रोशन कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सुधाकर हटवार, अशोक पटले, धनराज पारधीकर, ज्ञानेश्वर येळेकर यांच्यासह शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत प्रशासन सदैव सकारात्मक राहील आणि लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असा विश्वास उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.



