spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून श्री गणरायाची आराधना

मनपाच्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद : मनपामध्ये रक्तदान शिबिर मंगळवारी

नागपूर ता. २९ : नागपूर शहरामध्ये आरोग्यदायी कार्यामधून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे श्री गणरायाची आराधना करीत आहेत. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष द्वारे ‘आरोग्य श्रीगणेशा’ अभियानामार्फत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळ पुढाकार घेत आहेत. मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिर आयोजनाच्या आवाहनाला अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साद दिली आहे. या कार्यात मनपाचे कर्मचारी देखील योगदान देत असून, मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून मंगळवारी २ सप्टेंबर २०२५ रोजी मनपा मुख्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

गणेशोत्सवानिमित्त नागपूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष द्वारे ‘आरोग्य श्रीगणेशा’ अभियानामार्फत देखील आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे यासाठी गणेशोत्सव मंडळांना सहकार्य केले जात आहे.

मनपा पॅनल मधील रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा येथील रक्तपेढी आणि शहरातील इतर खासगी रक्तपेढीच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात येत आहेत. नागपूर शहरात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता हे रक्तदान शिबिर महत्वाचे ठरणार आहेत. गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत मनपामध्ये बैठक देखील घेण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने मनपाच्या सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयामधून विविध रक्तपेढी च्या सहकार्यातून गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत. शुक्रवारी मनपाच्या मेहंदीबाग आणि हनुमान नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांमध्ये आयोजित रक्तदान शिबिरामधून ८९ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.

नागपूर शहरात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या या उत्साहाच्या वातावरणात मंडळांनी एका सकारात्मक ऊर्जेने रक्तदान शिबिराचे आयोजन करावे व नागरिकांनी मोठ्या संख्येत रक्तदान करावे, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.