– ६ ऑक्टोबर रोजी प्रवाशांनी प्रवास करत केला विक्रम
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेची आपली बससेवा ही अधिकाधिक नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक वाढली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवसी अर्थात सोमवार ६ ऑक्टोबर रोजी या एकाच दिवशी आपली बसेने तब्बल १ लाख ८२ हजार १४८ प्रवाशांनी प्रवास करीत विक्रम केला आहे.
मनपाच्या आपली बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी सोमवार ६ ऑक्टोबर हा एक मैलाचा दगड ठरला आहे. प्रवाशांचा उदंड प्रतिसाद पाहता आपली बसवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते. प्रवासाच्या सुरक्षितता, वेगवान सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी नागरिक आपली बसचा अधिकाधिक वापर करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेला प्रतिसाद हा आपली बसच्या यशाचे प्रतीक आहे व शहराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
‘आपली बस’ ने ६ ऑक्टोबर रोजी तब्बल १ लाख ८२ हजार १४८ प्रवाशांची विक्रमी वाहतूक करून आपला आजवरचा सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा विक्रम नोंदवला आहे. हा टप्पा शहरात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. मनपाच्या परिवहन विभागाने केलेल्या या विक्रमी कामगिरी बद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी अभिनंदन व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
नागपूर महानगरपालिका आपल्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यास सदैव कटिबद्ध आहे आणि भविष्यातही प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत राहणार आहे. मनपातर्फे रोख आणि डिजिटल स्वरुपात सेवा दिली जात आहे. गेल्या काही दिवसात डिजिटल पेमेंटचे प्रमाण अधिक वाढताना दिसत आहे. डिजिटल नागपूरच्या दिशेने सकारात्मक पाऊल मानले जात आहे. याशिवाय अधिकाधिक विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, ‘आपली बस’ने नुकतीच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पास मोहीम सुरू केल्याने विद्यार्थीना अधिक आपली बस अधिक परवडणारी सुलभ बनली आहे. त्याचबरोबर शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल प्रवासाच्या पद्धतींना प्रोत्साहन दिले जात आहे. आपली बसला प्रवाशांच्या सर्वाधिक पसंती पडली आहे.




