spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘खोट्या आश्वासनांना युवक आता बळी पडणार नाही’; माजी आमदार चरण वाघमारे यांचा थेट हल्ला

– नवेगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

हंसराज, भंडारा :- गणेशोत्सवाच्या औचित्याने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या व्यासपीठावरून माजी आमदार चरण वाघमारे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशातील वातावरण आता बदलत असून, धर्म आणि जातीच्या नावाखाली युवकांची दिशाभूल करण्याचे दिवस संपले आहेत. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे खोटे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आता देशातील युवा वर्गच वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

कबड्डी स्पर्धेच्या निमंत्रणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले की, गेल्या १०-१२ वर्षांत देशात एकच हवा निर्माण केली गेली होती. परंतु, आश्वासन देऊनही हाताला रोजगार न मिळाल्याने आज युवकांचा भ्रमनिरास झाला आहे. राहुल गांधी, रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या संघर्षातून देशात आणि राज्यात एक नवीन आशा निर्माण झाली असून, सरकार चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला रोखण्याची ताकद आता युवकांमध्ये निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतींनी अधिकारांचा प्रभावी वापर करावा सरपंचांच्या अधिकारांवर भाष्य करताना वाघमारे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर किंवा नावावर होत नाहीत. त्यामुळे पक्षातील मतभेद बाजूला ठेवून सरपंचांनी ग्रामसभेला विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही ग्रामपंचायतीची मुख्य जबाबदारी आहे. सरपंचांनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर केल्यास गावातील विकासाची कामे कोणतीही ताकद थांबवू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी स्टार क्रीडा मंडळ नवेगाव एक दिवशी रात्र कालीन कबड्डी टूर्नामेंट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चरण वाघमारे होते, तर स्पर्धेचे उद्घाटन सरपंच रूपाली बांते यांच्या हस्ते झाले. सह-उद्घाटक म्हणून निखिल शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, पुंडलिक चौरागडे, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, माजी सरपंच अनवर सपाटे, महादेव मोहतुरे, जगदीश चकोले, तुळशीराम बांडेबूचे, अविनाश ढबाले, जगन गोमासे, महेश उमरकर, आनंदा तिबुडे, अक्षय शेंडे, विक्रांत मोहतुरे, आकाश चकोले, मयुरा तिबुडे, अमोल पुराम, अमोल चमलाटे यांच्यासह परिसरातील नागरिक, क्रीडाप्रेमी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कबड्डी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.