यवतमाळ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षण सोडतीसाठी 13 ऑक्टोबरला सभा संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 2025 नुसार जि. प. व पं. स. क्षेत्रात सभा घेऊन जागा निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी ही सोडत विशेष सभा होईल. याबाबतचे प्रकटन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निर्गमित केले आहे. त्यानुसार जि. प. निवडणूक विभागासाठी सोडतीची सभा दि. १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. यवतमाळमधील बळीराजा चेतना भवन येथे होणार आहे.
काही ठिकाणी स.११ ची वेळ
यवतमाळ पं. स. आरक्षण सोडत यवतमाळ तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, आर्णी पं. स. सोडत आर्णी येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, दारव्हा पं. स. सोडत दारव्हा येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, पुसद पं.स.सोडत पुसद येथील जिजामाता कन्या शाळा सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या जवळ होईल. उमरखेड पं.स.आरक्षण सोडत उमरखेड येथील जिजाऊ सांस्कृतीक भवन येथे, पांढरकवडा पं.सं आरक्षण सोडत पांढरकवडा येथील प्रकल्प कार्यालय नविन इमारतीमधील सभागृह येथे, घाटंजी पं.स.आरक्षण सोडत घाटंजी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात, वणी पं.स. आरक्षण सोडत वणी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात, राळेगाव पं. स. आरक्षण सोडत राळेगाव तहसिल कार्यालयातील सभागृहात होणार आहे. या सर्व सभा दि. १३ ऑक्टोबरला स. ११ वा. होतील.
काही ठिकाणी दु. ३ ची वेळ
त्याचप्रमाणे, बाभुळगांव पं. स. आरक्षण सोडत बाभुळगांव तहसील कार्यालयाच्या सभागृहात, नेर पं.स. आरक्षण सोडत नेर येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, दिग्रस पं.स आरक्षण सोडत दिग्रस येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, महागांव पं.स. आरक्षण सोडत महागांव येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, झरीजामणी पं.स आरक्षण सोडत झरीजामणी येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, मारेगांव पं.स. आरक्षण सोडत मारेगांव येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात, कळंब पं.सं आरक्षण कळंब येथील तहसिल, कार्यालयात सभागृहात होईल. या सात ठिकाणी सभा दि. १३ ऑक्टोबरला दु. ३ वा. होतील.
सभेद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यातील महिला आरक्षण, सर्वसाधारण महिला आरक्षण आदींसाठी सोडत काढण्यात येईल.



