मुंबई २५ : राज्यातील राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळजनक घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी लवकरच वाढू शकतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता कोकाटेंवर निर्णायक कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
कोकाटे यांच्या अनेक वेळच्या वादग्रस्त विधानांनी, तसेच अधिवेशनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या सर्व घटनांमुळे अजित पवार नाराज असून, सूत्रांच्या मते त्यांनी कोकाटेंना तीन वेळा तोंडी समजही दिली होती. मात्र, तरीही त्यांच्या वागण्यात कोणताही फरक न दिसल्यामुळे आता “कारवाई अपरिहार्य” असल्याची भावना पक्षात उघडपणे उमटू लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते – प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही पक्षांतर्गत बैठकीत कोकाटेंच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांचे स्पष्ट मत होते की, “सतत सूचना देऊनही जर वादग्रस्त कृती थांबत नसतील, तर निर्णय घेण्याची वेळ आता अजित पवार यांच्यावरच आहे.”
इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे समजते. एका मंत्र्याच्या वर्तनामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाची प्रतिमा धोक्यात येत असेल, तर त्यावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे, असा कडक संदेश मुख्यमंत्री देण्याच्या तयारीत आहेत.
राजकीय वर्तुळात असेही बोलले जात आहे की, कोकाटेंवर पुढील आठवड्यातच कारवाई होण्याची शक्यता असून, त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्याचा पर्यायही समोर ठेवला जाऊ शकतो. कोकाटेंवर ही कारवाई झाली, तर ती केवळ पक्षांतर्गत शिस्तीचा भागच नाही, तर इतर मंत्र्यांनाही “शिस्त भंग सहन केला जाणार नाही” असा ठोस इशारा ठरेल.
पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण झाला असताना, अजित पवार काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




